पाकनेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत: मेहबूबा मुफ्ती

वृत्तसंस्था
सोमवार, 22 एप्रिल 2019

भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत.

श्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बाडमेरमध्ये रविवारी (ता. 21) सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले होते की, 'पाकिस्तान वारंवार भारताला त्यांच्याकडे असलेल्या अण्वस्रांची धमकी देत आला आहे. मात्र, आता भारत त्यांच्या धमक्यांना घाबरत नाही. आमच्याकडेही अण्वस्त्रे असून, ती आम्ही दिवाळीसाठी राखून ठेवलेले नाहीत.' मोदींच्या राजतीय वक्तव्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी टीका करताना म्हटले आहे की, भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत.'

गुजरातमधील पाटण येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, की देशाच्या सुरक्षेला आपल्या सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले. पंतप्रधानपदाची खुर्ची राहो अथवा जावो, पण दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा निश्‍चय मी केला होता. बालाकोटवरील कारवाईवेळी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन हे शेजारी देशाच्या तावडीत सापडले होते. मात्र अभिनंदन यांना मायदेशी पाठवले नाही तर गंभीर परिणाम होतील, असा इशारा पत्रकार परिषद घेऊन सरकारने दिला होता. "मोदींनी 12 क्षेपणास्त्रे तयार ठेवली असून, कदाचित पाकिस्तानवर हल्ला केला जाईल आणि त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते,' असा दावा त्या वेळी अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केले होता. मात्र पाकिस्तानने अभिनंदन यांना मुक्त केले, अन्यथा ती "कत्तल की रात' ठरली असती. हे अमेरिकेच्या अधिकाऱ्याने म्हटले होते, मला याबाबत काहीही म्हणायचे नाही. योग्य वेळी मी याबाबत बोलेन, असेही मोदी म्हणाले.

Web Title: Pakistans nuclear arsenal is not for Eid says Mehbooba Mufti on PM Modi's weapons for Diwali remark