अभिनेते परेश रावल एनएसडीच्या प्रमुखपदी; राष्ट्रपतींकडून नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 September 2020

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची एनएसडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती चार वर्षासाठी असून २०१७ पासून हे पद रिक्त होते.

नवी दिल्ली - बॉलिवूडचे प्रख्यात अभिनेते परेश रावल यांना गुरुवारी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची एनएसडीच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती चार वर्षासाठी असून २०१७ पासून हे पद रिक्त होते.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी रावल यांच्या निवडीबद्धल अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटले की, प्रसिद्ध कलांवत परेश रावल यांची राष्ट्रपतींनी एनएसडीच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. त्यांच्या प्रतिभेचा लाभ देशातील कलाकार आणि विद्यार्थ्यांना मिळेल. त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
 

एनएसडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही रावल यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले आहे. एनएसडी कुटुंब या महान कलाकाराचे स्वागत करते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी आणखी नवी उंची गाठेल, असे ट्विटरवर म्हटले आहे. 

परेश रावल 65 वर्षांचे असून ते चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. या निवडीनंतर रावल यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, की, एनएसडीचे अध्यक्षपद आव्हानात्मक पण रंजक आहे. अभिनय क्षेत्राला मी जवळून पाहिल्याने मी माझ्या परीने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. भाजपचे माजी खासदार असणारे परेश रावल यांनी २०१४-१९ या काळात अहमदाबाद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paresh rawal elected as chief of NSD by president ramnath kovind