‘‘परीक्षा पे चर्चा’’ साठी लाखो विद्यार्थी व शिक्षकांकडून वेगवेगळे प्रश्न व सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pariksha pe charcha event nerandra modi communication questions from students and teachers

‘‘परीक्षा पे चर्चा’’ साठी लाखो विद्यार्थी व शिक्षकांकडून वेगवेगळे प्रश्न व सूचना

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित ‘‘परीक्षा पे चर्चा’’ या कार्यक्रमासाठी यंदा लाखो विद्यार्थी व शिक्षकांकडून वेगवेगळे प्रश्न व सूचना आल्या आहेत. या प्रतिसादामुळे भारावून गेलेल्या पंतप्रधानांनी आज खास ट्विट करून, हा उत्साह अद्भुत (गजब) आहे असे नमूद केले. दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेवेळी विद्यार्थी, शिक्षक व विशेषतः पालकांनी गुणांचा अवास्तव ताणतणाव न घेता परीक्षा आनंददायी बनवावी या मूळ उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम 4 वर्षांपूर्वी सुरू केला.

दिल्लीच्या तालकटोरा आच्छादित मैदानात पंतप्रधान दरवर्षी हा संवाद साधतात. मात्र कोरोना महामारीमुळे गेली 2 वर्षे यात खंड पडला. त्यामुळे पंतप्रधानांनी आभासी पध्दतीने विद्यार्थ्यांना संबोधीत केले होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने यंदा पूर्वीच्याच दिमाखात तालकटोरा 1 एप्रिल रोजी हा कार्यक्रम होणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने याबाबत शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्याकडून सूचना मागविल्या होत्या. हे आवाहन केल्यावर जेमतेम पंधरवड्याच्या कालावधीत लाखो सूचना मं6ालय व माय जीओव्ही च्या संकेतस्थळांवर आल्या आहेत. पंतप्रधानांनी याची खास दखल घेत ट्विट केले की, यंदाच्या परीक्षा पे चर्चा बाबत लाखो लोकांनी आपले बहुमूल्य विचार, सूचना व अनुभव मला पाठविले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे शिक्षकांचे मी आभार मानतो. आपण स्वतः एक एप्रिलची आतुरतेने वाट पहात आहोत असेही मोदी यांनी नमूद केले.

‘‘परीक्षा पे चर्चा’’ च्या यंदाच्या पाचव्या भागात अनेक नवीन प्रयोग राबविण्यात येणार आहेत. देशातील सर्व राज्यपाल त्या त्या राज्यांतील राजभवनांत निवडक विद्यार्थ्यांसह परीक्षा पे चर्चा चे थेट प्रसारण पाहतील. त्याचप्रमाणे जेथे भारतीय मोठ्या संख्येने आहेत त्या देशांतील दूतावासांत हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाणार आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की परीक्षेचा दबाव न घेता विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे यासाठी पंतप्रादानंचा हा संवाद अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे दिसले आहे. कोरोना महामारी नंतर यंदा प्रथमच पूर्ण परीक्षा पूर्वीप्रमाणेच होतील व त्यामुळेच यंदा काही विशेष भाग यात जोडले गेले आहेत. केंद्रीय विद्यालये, विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांमध्येही यंदाच्या परीक्षा पे चर्चा चे थेट प्रसारण केले जाणार आहे.

Web Title: Pariksha Pe Charcha Event Nerandra Modi Communication Questions From Students And Teachers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..