देशभर ‘पर्जन्यमाया’

‘मॉन्सून’सरासरी एवढा; महाराष्ट्रावरही ‘कृपादृष्टी’
weather forecast
weather forecastsakal
Updated on

नवी दिल्ली : बळीराजाला सुखावणारी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांबरोबर येणारा मॉन्सून यंदा सरासरी एवढा म्हणजे ९९ टक्के बरसणार आहे. देशावरील ‘पर्जन्यमाया’ कायम राहणार असल्याने अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी ‘मॉन्सून’चा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज आज जाहीर केला. हवामान विभागाने यंदा १९७१ ते २०२० कालावधीतील आकडेवारी विचारात घेऊन सुधारित दीर्घकालीन सरासरी जाहीर केली आहे.

सुधारित सरासरीनुसार देशाची ‘मॉन्सून’ची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर निश्चित करण्यात आली आहे. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या ‘मॉन्सून’मध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (४० टक्के), तर दुष्काळाची शक्यता १४ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९८ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस पडला होता.

‘स्टॅटेस्टिकल एनसेंबल फोरकास्टींग सिस्टिम’(एसईएफएस) चा वापर करून अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार देशात यंदा ९९ टक्के पावसाची शक्यता असून, दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तर भाग, मध्य भारत, हिमालयाचा पायथा, वायव्य भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये, वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग, दक्षिण भारतातील राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे.

गेल्यावर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशात सर्वसामान्य पाऊस पडला होता. देशात सरासरी एवढा पावसाची नोंद झालेले हे सलग तिसरे वर्ष होते. २०१९ आणि २०२० मध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला होता.

ला-निना स्थिती कायम राहणार

प्रशांत महासागरात सध्या ला-निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. प्रशांत महासागरात ला-निना स्थिती असल्यास देशात चांगला पाऊस पडतो, असे समजले जाते. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामाच्या सुरुवातीला ही स्थिती कायम राहणार असली तरी, नंतर आयओडी नकारात्मक (निगेटिव्ह) होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात चांगला पाऊस

यंदाच्या ‘मॉन्सून’मध्ये महाराष्ट्रातही यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. हवामान विभागाने जारी केलेल्या नकाशानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहू शकते असेही स्पष्ट होत आहे.

पावसाची शक्‍यता

  • ९० टक्‍क्‍यांहून कमी १४ टक्के

  • ९० ते ९६ टक्के २६ टक्के

  • ११० टक्‍क्‍यांहून अधिक ५ टक्के

  • १०४ ते ११० टक्के १५ टक्के

  • ९६ ते १०४ टक्के ४० टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com