
Piyush Goyal : बिहारबाबत गोयल यांचा ‘यू टर्न’
नवी दिल्ली : ''हे लोक संपूर्ण देशाला बिहार बनवतील'' असे संतापाच्या भरात राज्यसभेत केलेले विधान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी अंगलट आले. हे विधान मागे घेताना, कोणाचाही अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता असा खुलासा त्यांना करावा लागला. मात्र गोयल यांनी बिहार व वरिष्ठ सभागृहाची माफी मागावी अशी जोरदार मागणी काँग्रेस, बिहारमधील सत्तारूढ संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल, डावे पक्ष व विरोधकांनी लावून धरली आहे.
गोयल यांनी राज्यसभेतील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याची धग जाणवताच भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना राज्यसभेत धाडले आणि गोयल यांना बोलावून घेतले. त्यानंतर गोयल यांनी ‘यू टर्न'' घेतला. गोयल यांनी सांगितले की, ‘बिहारचा किंवा बिहारच्या जनतेचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही.
यामुळे कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी ते विधान तत्काळ मागे घेतो.‘ या मुद्द्यावरून बिहारच्या खासदारांनी गुरुवारी गांधी पुतळ्यासमोर निदर्शने केली. त्यात भाजप वगळता इतर पक्षांच्या खासदारांनी सहभाग घेतला. काँग्रेस, राजद , जेडीयू, डावे आणि शिवसेनेसह अनेक पक्षांचे खासदार यात सहभागी झाले होते.
राजद खासदार मनोज झा यांनी गोयल यांच्या माफीनाम्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की गोयल यांनी माफी मागितली नाही, तर पंतप्रधान आणि त्यांचा संपूर्ण पक्ष गोयल यांच्या वक्तव्यासोबत असल्याचे मी मानेन.