Parliament Attack 2001: लोकशाहीच्या मंदिरावर कसा झाला दहशतवादी हल्ला? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parliament Attack.

दिवस होता 13 डिसेंबर, 2001. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं.

Parliament Attack 2001: लोकशाहीच्या मंदिरावर कसा झाला दहशतवादी हल्ला?

दिवस होता 13 डिसेंबर, 2001. संसदेत विरोधकांच्या गदारोळात हिवाळी अधिवेशन सुरू होतं. महिला आरक्षण विधेयकावरून गेले काही दिवस संसदेत गदारोळ सुरू होता. संसद परिसरात सभागृहाच्या आतपासून ते बाहेरपर्यंत सगळीकडे नेते, पत्रकार बिनदिक्कत फिरत होते, बोलत होते. सगळं रोजच्यासारखं सुरू होतं. 

विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज 40 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपायी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी हे आपल्या निवासस्थाळाकडे निघाले होते. पण, उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह देशाचे अनेक मोठे नेते त्यावेळी संसदेमध्येच उपस्थित होते. 

सकाळी 11 वाजून 28 मिनिटाला एक पांढरी अॅम्बेसडर कार संसद भवन परिसरात गेट क्रमांक 12 मध्ये आली. कारच्या वरती लाल दिवा लावण्यात आला होता आणि समोरच्या काचेवर गृहमंत्रालयाचे स्टीकर लावण्यात आले होतं. सर्वसाधारणपणे संसद भवनात आल्यानंतर गाड्यांची स्पीड कमी होते, पण अॅम्बेसडर कारची स्पीड जास्त होती. त्यामुळे संसद भवनात सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक जगदीश यादव यांना शंका आली. ही तेव्हाची घटना आहे जेव्हा लोकशाहीचं मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. 

विजय मल्ल्याची अवस्था बिकट, वकिलाची फी देण्यासही नाहीत पैसे

11 वाजून 30 मिनिटाला गेट क्रमांक 11 वर तत्कालीन उप-राष्ट्रपती कृष्णकांत यांचा ताफा निघणार असल्याने सुरक्षारक्षक त्यासाठी वाट पाहात होते. तेवढ्यात अॅम्बेसडर कार उपराष्ट्रपतींच्या कारच्या ताफ्याकडे येऊ लागली. सुरक्षारक्षक जगदीश यादव या कारच्या मागे धावत आले. त्यांनी कार चालकाला थांबण्याचा इशारा केला, पण चालकाने त्याकडे दुर्लक्ष केलं. जगदीश यादव वेगाने धावत येताना पाहून उप-राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात असणारे सुरक्षारक्षक अलर्ट झाले. ASI जीत राम, ASI नानक चंद आणि ASI श्याम सिंह यांनी पांढऱ्या अॅम्बेसडर कारला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कार थांबली नाही आणि अॅम्बेसडर कार उपराष्ट्रपतींच्या कारला जाऊन धडकली.

कारला टक्कर मारल्यानंतर कारमधील सर्व दहशतवादी संसदेच्या गेट क्रमांक 1 जवळ दरवाजे उघडून खाली उतरले आणि त्यांनी अंधाधूंद गोळीबार सुरु केला. त्यांच्या हातात AK-47 आणि हँडग्रेनेडसारखी आधुनिक शस्रास्त्रं होती. संसद परिसरात अतिरेक्यांच्या हातातील ऑटोमॅटिक AK-47 मधून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांच्या आवाज ऐकताच नेत्यांसह तिथे उपस्थित लोकांचे चेहरे भीतीने काळवंडले. संसदेच्या आतपासून बाहेरपर्यंत अफरातफर सुरू होती. नेमकं काय घडतंय, हे कुणालाच कळत नव्हतं. सगळेच आपापल्या परीने घटनेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते.

तेवढ्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एमर्जेन्सी अलार्म वाजवला आणि संसदेचे सर्व गेट तात्काळ बंद झाले. तेवढ्यात एक दहशतवादी संसद भवनच्या गेट क्रमांक एक कडे धावला. तो सभागृहात घुसु पाहात होता, जेणेकरुन खासदारांना लक्ष्य करता येईल. पण, तेथे तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्याला गोळ्या घातल्या. 

गेट क्रमांक 1 वर जखमी झालेल्या दहशतवाद्याच्या बॅगमध्ये स्फोटके होती. त्याने स्वत:ला रिमोटने उडवले. यावेळी अनेकांना संसदेचा एखादा भाग उडवण्यात आल्याचा भास झाला. यावेळी संसद भवन परिसरात दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. तोपर्यंत सेना आणि एनएसजीला संसदेवर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. 

Farmers Protest: यूपीच्या शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; दिल्ली-नोएडा सीमा खुली

11 वाजून 55 मिनिटाला गेट क्रमांक 1 वर दुसऱ्या दहशतवाद्यालाही मारण्यात यश आले. दहशतवादी आता चारी बाजूंनी घेरले गेले होते, त्यांना त्यांचे 2 साथी मारले गेल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत गेट क्रमांक 9 मधून सभागृहात घुसू पाहात होते. त्यांनी गोळीबार सुरु ठेवत गेट क्रमांक 9 कडे जाण्याचा प्रयत्न केला, पण 12 वाजून 5 मिनिटाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना घेरलं. तेवढ्यात दहशतवाद्यांनी त्यांच्याकडील हातबॉम्ब टाकण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षकांनी एक-एक करुन तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. जवळजवळ 45 मिनिटे दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हा गोळीबार सुरु होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची एक महिला सुरक्षारक्षक, राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एका माळ्याचा मृत्यू झाला होता.

(edited by- kartik pujari)

टॅग्स :L K Advani