esakal | पेगॅसस प्रकरणी विरोधकांचा गोंधळ; चार मिनिटातच लोकसभा स्थगित
sakal

बोलून बातमी शोधा

loksabha

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज सुरु झाल्यानंतर चार मिनिटाच्या आतच लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

पेगॅसस प्रकरणी विरोधकांचा गोंधळ; चार मिनिटातच लोकसभा स्थगित

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी पेगॅसस प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज सुरु झाल्यानंतर चार मिनिटाच्या आतच लोकसभा 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तर राज्यसभा 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलीये. पेगॅसस स्पायवेअरच्या तंत्रज्ञानातून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेते आणि पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. जगभरातील 16 माध्यम संस्थांनी याबाबत दावा केला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळ घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे दोन्ही सभागृह स्थगित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत 2 वाजता कोरोनाच्या मुद्द्यावर बोलणार असल्याची माहिती आहे. (parliament monsoon session live 2021 Pegasus Battle Opposition congress bjp loksabha rajyasabha)

विरोधकांनी कामकाज सुरु होऊ न दिल्याने पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. काँग्रेसचं अस्तित्व संपत चाललंय तरी त्यांना आमची चिंता लागली आहे. आसाम, केरळ, पश्चिम बंगालमधील पराभवानंतरही काँग्रेसचे डोळे उघडले नाहीत. विरोधक कोरोनाच्या चर्चेपासून पळ काढताहेत. ते नकारात्मक वातावरण तयार करताहेत, असं मोदी म्हणाले. सरकारची काम जनतेसमोर पोहोचवा, सत्य वारंवार जनतेला सांगा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही विरोधकांची आक्रमकता सरकारवर भारी पडल्याने सरकारची कोंडी झाल्याचे दिसले. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना केंद्रीय मंत्रिमंडळातील नव्या सहकाऱ्यांचा लोकसभेला परिचय करून देता आला नाही. यामुळे नाराज पंतप्रधानांनी, मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात महिला, दलित, आदिवासींचा समावेश असताना त्यांच्या परिचयात अडथळा आणून काही जणांनी दलितविरोधी, महिलाविरोधी मानसिकता दर्शविली असल्याचे म्हणत कॉंग्रेसला लक्ष्य केले. पत्रकार, न्यायाधीश, राजकीय नेते, मंत्री यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पेगॅसस या सॉफ्टवेअरचा सरकारने वापर केला असल्याच्या आरोपांवरून विरोधकांनी विशेषतः कॉग्रेसने दोन्ही सभागृहे दणाणून सोडली. १३ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात १९ बैठका प्रस्तावित आहेत. येत्या बुधवारी बकरी ईद निमित्ताने संसद कामकाजास सुटी राहील. मात्र गोंधळ पाहता पहिल्या आठवड्यातील उर्वरित दोन दिवसांमध्ये कितपत कामकाज होईल याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

loading image