
'तमाशा लावलाय का ? घरावर बुलडोझर चालविणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने फटकारले
पटना - मागील काही दिवसांपासून बुलडोझर कारवाई चर्चेत आली आहे. आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालविण्यात आले होते. अशीच एक घटना आता बिहारमधून समोर आली आहे. मात्र बिहारमधील घटनेमुळे उच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना बुलडोझर कारवाईवरून फटकारलं आहे. तसेच तुम्ही एखाद्या व्यक्तीचं प्रतिनिधीत्व करत आहात की, राज्याचं असा संतप्त सवालही न्यायालयाने विचारलं आहे.
हेही वाचा: Amol Kolhe: शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान! खासदार कोल्हेंनी प्रसाद लाडांना जोडले हात; म्हणाले...
तमाशा लावलाय का, असा संतप्त सवाल न्यायालयाने विचारला. तसेच न्यायालयाने म्हटलं की, चुकीच्या पद्धतीने घर पाडण्यात आले असेल तर संबंधितांना प्रत्येकी पाच लाख रुपये अधिकाऱ्यांच्या खिशातून दिले जातील, याची खातरजमा करण्यात येईल. आता पोलीस आणि सीईओ लाच घेऊन घर पाडत आहेत, हे सगळं थांबवायला हवं, असं याचिकाकर्त्याच्या वकिलाने म्हटलं आहे. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीच्या वेळी न्यायाधीशांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला हजर राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा: Dipali Sayyed: दीपाली सय्यद स्वार्थासाठी पक्षांतर करतात का? अभिनेत्री म्हणाल्या...
या प्रकरणाची सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी झाली होती, मात्र शनिवारी या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला. जेव्हा याचिकाकर्त्याच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, भूमाफियांच्या सांगण्यावरून जमीन रिकामी करण्यास भाग पाडल्याबद्दल याचिकाकर्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तेव्हा न्यायाधीशांनी सांगितले की आम्ही याचिकाकर्त्याच्या संरक्षणाची काळजी घेऊ.