Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरांना मोठा दिलासा, SC कडून अंतरिम जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi And Pawan Khera

Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरांना मोठा दिलासा, SC कडून अंतरिम जामीन मंजूर

Pawan Khera : काँग्रेस नेते पवन खेरा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खेरा यांना आज सकाळी आसाम पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.

त्यानंतर खेरा यांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यात न्यायालयाने खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

पवन खेरा यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामिनावर सोडण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. काँग्रेसच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले आहे.

तसेच या प्रकरणाचे सर्व खटले एकाच ठिकाणी वर्ग करण्याच्या मागणीवर न्यायालयाने यूपी आणि आसाम पोलिसांना नोटीस बजावली आहे.

खेरांना का करण्यात आली होती अटक?

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर भाजपकडून खेडा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आज खेरा यांना दिल्ली विमानतळावर प्रवास करण्यापासून रोखण्यात आले होते. तसेच आसाम पोलिसांनी अटक केली होती.

वादग्रस्त टिपण्णीनंतर खेरा यांच्या विरेधात आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खेरांची अटक म्हणजे हुकूमशाही  

दरम्यान, खेरा यांच्या अटकेनंतर काँंग्रेस नेते आक्रमक झाले होते. खेरा यांची ही अटक म्हणजे हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. खेरा यांचे सामान तपासण्याचे कारण देत त्यांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

त्यानंतर या अटकेविरोधात खेरांकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी पार पडली असून, न्यायालयाने खेरा यांना 28 फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामिनावर सोडण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.