esakal | "सुरक्षेसाठी माझा फोन प्लास्टर केलाय"; ममतांचा केंद्रावर निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

"सुरक्षेसाठी माझा फोन प्लास्टर केलाय"; ममतांचा केंद्रावर निशाणा

sakal_logo
By
अमित उजागरे

कोलकाता : पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरुन केंद्र सरकार विरोधकांच्या चांगलंच निशाण्यावर आलं आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर दोन दिवसांत काँग्रेस चहुबाजूने मोदी सरकारवर हल्ले सुरु केले असतानाच आता यामध्ये ममता बॅनर्जींनी देखील उडी घेतली आहे. "हेरगिरीपासून प्रतिबंधासाठी मी माझा फोनही आता प्लास्टर करुन ठेवलाय असं त्यांनी म्हटलं असून आता केंद्र सरकारलाही प्लास्टर करायची वेळ आली आहे," अशा शब्दांत त्यांनी केंद्रावर हल्लाबोल केला. तृणमूल काँग्रेसकडून आज (२१ जुलै) शहीद दिवस पाळला जातो. यानिमित्त पक्षाच्या कार्यकर्ते, नेत्यांना व्हर्च्युअली संबोधित करताना ममता बॅनर्जी बोलत होत्या.

"आपले फोन टॅप केले जात आहेत. पेगॅसस प्रकरणं हे धोकादायक आणि भयानक आहे. यामुळे मी कोणाशीही बोलू शकत नाही. सरकारनं हेरगिरीसाठी जनतेचा खूप पैसा खर्च केला आहे. माझा फोनही मी प्लॅस्टर करुन ठेवलाय. आपल्याला आता केंद्र सरकारलाही प्लॅस्टर केलं पाहिजे, नाहीतर देश उद्ध्वस्त होईल. भाजपनं भारताच्या संघराज्य पद्धतीवर बुलडोझर चालवला आहे," अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

यापुढे जोपर्यंत भाजप देशातून नष्ट होत नाही तोपर्यंत आता सर्वच राज्यांमध्ये 'खेला होबे' सुरु होईल. यासाठी आम्ही १६ ऑगस्ट रोजी खेला दिवस साजरा करणार आाहोत. सध्या आपलं स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. भाजपकडून आपल्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात आहे. भाजपला त्यांच्या स्वतःच्या मंत्र्यांवर विश्वास नाही तसेच त्यांच्याकडून केंद्रीय तपास एजन्सीजचा गैरवापर केला जात आहे, असंही ममता यांनी म्हटलं आहे.

तिसऱ्या लाटेसाठी केंद्रानं कुठलीही तयारी केलेली नाही - ममता

ममता म्हणाल्या, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशानं गंगेत तरंगणारे मृतदेह पाहिले आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले आहेत पण सरकार म्हणतंय की, "ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं एकही मृत्यू झालेला नाही. केंद्र सरकार केवळ पोपटपंची करण्यात व्यस्त आहे. त्यांनी तिसऱ्या लाटेचीसाठी कुठली तयारीही केलेली नाही," असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

loading image