esakal | प्रलंबित खटल्यांचा उल्लेख ममतांच्या अर्जात नाही
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banerjee

प्रलंबित खटल्यांचा उल्लेख ममतांच्या अर्जात नाही

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे असंख्य तक्रारी केल्या होत्या. आता भवानीपूर पोटनिवडणुकीच्यावेळी त्यांच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार झाली आहे. स्वतःविरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्यांचा उल्लेख ममता यांनी उमेदवारी अर्जात केला नसल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली.

भाजपच्या उमेदवार प्रियांका टिब्रेवाल यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी साजल घोष यांनी ही तक्रार केली. ममता यांनी जाहीर केलेल्या तपशिलाबाबत त्यांनी आक्षेप नोंदविले.

आयोगाला पाठविलेल्या पत्रात त्यांनी आसाममधील विविध पोलिस ठाण्यांत ममता यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपशीलही दिला आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान होईल. निकाल तीन ऑक्टोबर रोजी जाहीर होईल.

गुन्हे कोणते

साजल घोष यांनी नमूद केलेल्या माहितीनुसार ममता यांच्याविरुद्ध पुढील गुन्हे आहेत ः

  • भारतीय दंडविधान कलम १२१ (सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे किंवा तसा प्रयत्न करणे किंवा त्यास चिथावणी देणे

  • १२० ब (गुन्हेगारी कारस्थानाबद्दल कारवाई)

  • १५३ अ (धर्म, वर्ण, जन्माचे ठिकाण, निवास आणि भाषा या आधारावर विविध गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे)

  • ५०६ (गुन्हेगारी स्वरूपाची भीती दाखविल्याबद्दल कारवाई)

तेव्हा काय घडले

मार्चमध्ये नंदीग्राम निवडणुकीच्यावेळी सुवेंदू अधिकारी यांनी ममता यांच्याविरुद्ध अशीच तक्रार केली होती. आसाममधील पाच आणि सीबीआयने दाखल केलेला एक अशा सहा खटल्यांचा उल्लेख नसल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यावेळी निवडणूक आयोगाने तो फेटाळून लावला होता. हे गुन्हे ममता बॅनर्जी याच नावाच्या दुसऱ्या महिलेविरुद्ध दाखल असल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते.

निवडणूक आयोगाने ममतांचा अर्ज नाकारलाच पाहिजे. त्यांनी वस्तुस्थिती दडपली आहे.

- साजल घोष

ही खोटी तक्रार आहे. मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचा डाव आहे. नंदीग्राम निवडणुकीच्या वेळी सुद्धा भाजपने हेच केले होते.

- फिरहाद हकीम, तृणमूलचे वाहतूक मंत्री

loading image
go to top