Video: माझ्या हाताला पकडून मला म्हणाली...

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

गावाला पाण्याने वेढलेले.. जवळपास 40 लोक अडकलेली.. गावात पोहचल्यानंतर चिमुकली माझ्याजवळ आली अन् माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची विनवणी केली. मग...

अहमदाबादः गावाला पाण्याने वेढलेले.. जवळपास 40 लोक अडकलेली.. गावात पोहचल्यानंतर चिमुकली माझ्याजवळ आली अन् माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची विनवणी केली. मग, कोणताही विचार न करता दोघींना कडेवर घेतले अन् चालत निघालो, असे पोलिस शिपायी पृथ्वीराज जडेजा यांनी सांगितले.

गुजरातमधील मोरबी पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असलेले पोलिस शिपाई पृथ्वीराज जडेजा हे दोन चिमुकलींना खांद्यावर घेऊन जात असताने छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. शिवाय, ते चर्चेतही आले. नेटिझन्सनी त्यांच्या धाडसाचे कौतुक करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जडेजा म्हणाले, 'कच्छमधील गावातून फोन आल्यानंतर आमचे पथक मदतीसाठी तत्काळ निघालो. गावात पोहचल्यानंतर गाव पाण्याने वेढलेले दिसत होते. गावात जाण्याचा मार्गही नव्हता. गावात जवळपास 40 जण पाण्यामध्ये अडकले होते. त्यावेळी, फक्त एकच विचार डोक्यात होता. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवायचे. डोक्यात विचार सुरू असतानाच लहान मुलगी माझ्याजवळ आली होती. माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची विनवणी केली. कोणताही विचार न करता दोन चिमुकल्यांना खांद्यावर घेतले अन् पुराच्या पाण्यातून चालत निघालो. पाण्याचा वेग तोडताना पावले जड पडत होती. पण, हे अंतर कापून चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढायचा एवढाच विचार डोक्यात होता. जवळपास दीड किलोमीटर पाण्यातून चालून चिमुकल्यांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले.'

दरम्यान, पाण्याने चोहोबाजूंनी वेढलेले असतानाही तब्बल दीड किलो मीटरचे अंतर या बहाद्दर पोलिस शिपायानं पार केले आहे. सोशल मीडियावर या पोलिसाच्या कर्तव्यदक्षतेला सलाम ठोकला जात आहे. तर, अनेकजण खाकी वर्दीतला माणूस म्हणून जडेजा यांच कौतुक करत आहे. विशेष म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनीही ट्विट करुन पोलिस शिपाई पृथ्वीराज जडेजा यांचे कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People salute to police constable who work hard in flood morbi