राजधानी दिल्लीत गणरायांचे जल्लोषात स्वागत 

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 3 September 2019

"गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

नवी दिल्ली : "गणपती बाप्पा मोरया'चा जल्लोष आणि ढोल-ताशांच्या ठेक्‍यावर राजधानी दिल्लीसह परिसरातील विविध मंडळांनी आज गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली. गणरायाच्या आगमनासाठी असेच जल्लोषपूर्ण व भक्तिमय वातावरण संपूर्ण दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात दिसून आले.

महाष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची दीर्घ परंपरा आहे. यानिमित्त महाराष्ट्र सदनातील उत्सव समितिच्या वतीने महाराष्ट्र सदनाचे निवासी सहआयुक्त श्‍यामलाल गोयल यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली. निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा यांच्यासह राज्य सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

तत्पूर्वी कोपर्निकस मार्गावर गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पूजा, मंत्रोच्चार व "श्रीं'ची आरती होऊन गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिल्ली व परिक्षेत्रातील जवळपास 40 मराठी गणेशोत्सव मंडळांतही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिल्ली व परिसरात गणेशोत्सव काळात सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल आहे. विविध गणेश मंडळांनी या काळात महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मराठमोळी लावणी, नाटक, संगीत रजनी, झांज पथकांचे सादरीकरण, कीर्तन, भजन संध्या आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन या वर्षी करण्यात आले आहे. 

सांस्कृतिक मेजवानी 
सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिली जाते. आता आनंद विहार, गुडगाव, नोएडा या भागांतील मंडळांनीही ती परंपरा सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समितीतर्फे यंदा दिल्ली हाट येथे दररोज तर मावळणकर सभागृहात सहा ते आठ सप्टेंबर या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील असे या संस्थेच्या नीना हेजीब यांनी सांगितले. ता. सहा रोजी "शांतेचं कार्टं चालू आहे' व सात सप्टेंबरला "वेलकम जिंदगी' हे नाटक व आठ तारखेला "सूर नवा ध्यास नवा' हा बालकलाकारांचा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People welcomes Shree Ganesh in Delhi