TikTokसह 59 चिनी अ‍ॅप्सवर भारतात 'पर्मनंट' बंदी

सकाळ ऑनलाइन टीम
Tuesday, 26 January 2021

या यादीत टीकटॉकशिवाय व्हिगो व्हिडिओ, शेअरइट, यूसी ब्राऊजर, हॅलो आणि लाइकीसारख्या ऍप्सचा समावेश होता.

नवी दिल्ली- मागील वर्षी जूनमध्ये TilTok आणि WeChatसह एकूण 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली होती. आता भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी  मंत्रालयाने या 59 चिनी अ‍ॅप्सवर कायमची बंदी घातली आहे. काही माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात या सर्व अ‍ॅप्सवर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आल्याचे म्हटले आहे. 

जून 2020 मध्ये आणि त्यानंतर भारत सरकारने अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. सरकारने या अ‍ॅप्सच्या माध्यमातून गोळा केली जात असलेली माहिती आणि त्याच्या वापरावर सवाल उपस्थित केले होते. याबाबत संबंधित अ‍ॅप्सच्या कंपन्यांना स्पष्टीकरणही मागण्यात आले होते. परंतु, समोर आलेल्या वृत्तानुसार या कंपन्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर सरकार संतुष्ट नसल्याचे सांगण्यात येते. सरकारने मागील आठवड्यात या कंपन्यांना एक नवीन नोटीस जारी केली. त्यात सरकार त्यांच्या उत्तरावर समाधानी नसल्याचे म्हटले. त्यानंतर कायमस्वरुपी बंदीचा निर्णय घेण्यात आला. 

हेही वाचा- ब्युटी विथ ब्रेन; भारतातील ग्लॅमरस महिला राजकारणी

दरम्यान, मागीलवर्षी जूनमध्ये सरकारने आयटी ऍक्ट, 2000 कलम 69 (ए) अंतर्गत टीकटॉकसह अँड्राएड आणि आयओएसवर एकूण 59 चिनी मोबाइल ऍप्लिकेशनवर बंदी घातली होती. या यादीत टीकटॉकशिवाय व्हिगो व्हिडिओ, शेअरइट, यूसी ब्राऊजर, हॅलो आणि लाइकीसारख्या ऍप्सचा समावेश होता. मंत्रालयाकडून सांगण्यात आले की, हे ऍप्स यूजर्सचा डेटा चोरुन त्यांना भारताबाहेरील सर्व्हरवर विना परवानगी आणि बेकायदा पद्धतीने पाठवले जातात, अशा विविध ठिकाणांहून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. मंत्रालयाने या तक्रारीवरुन या कंपन्यांना काही प्रश्न विचारले होते. 

त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये सरकारने लोकप्रिय व्हिडिओ गेम पबजीसह आणखी 118 चिनी ऍप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्येही अनेक चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली. गेल्या वर्षी काही महिन्यांच्या अंतरावर भारत सरकारने सुमारे 200 चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. 

हेही वाचा- भारतीय यूजर्संना व्हॉट्सॲपची वेगळी वागणूक;केंद्र सरकारची दिल्ली उच्च न्यायालयामध्ये माहिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permanent ban on 59 Chinese apps in India including TikTok