शंभरीच्या दिशेने पेट्रोलची घोडदौड सुरुच; सलग 8व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे.

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने सलग आठव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. दररोज वाढत्या भावांमुळे या किंमतींचा नवनवा रेकॉर्ड बनतो आहे. आज डिझेलच्या किंमतींमध्ये जवळपास 35 ते 38 पैशांनी वाढ झाली आहे तर पेट्रोलच्या किंमतींमध्ये 29 ते 30 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबई शहरामध्ये पेट्रोलच्या किंमती या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वोच्च स्तरावर आहेत. 

आजच्या नव्या दरवाढीसह दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 89.29 रुपये झाले आहेत तर मुंबईमध्ये 95.75 रुपयांवर पेट्रोल आहे. तर डिझेलचे भाव दिल्लीमध्ये 79.70 रुपये आहे तर मुंबईमध्ये 86.72 रुपये आहे. मुंबईमध्ये डिझेलचे भाव आतापर्यंतच्या सर्वोच्च स्थानावर आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये पेट्रोलचे भाव 2.44 रुपयांनी वाढले आहेत तर डिझेलचे भाव 2.57 रुपयांनी वाढले आहे. 

हेही वाचा - हिंदू संघाती मैदानात उतरणार

परभणीत पेट्रोलची शंभरी
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या रविवारी पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पार गेले आहेत. कारण दळणवळणामध्ये परभणी दूरवर आहे. परभणीमध्ये पेट्रोल नाशिक जिल्ह्यामधून येतं. म्हणजे जवळपास 340 किमी अंतर कापावं लागतं. भोपाळ शहरामध्ये प्रीमीयम पेट्रोलचे भाव 100 च्या पार गेले आहेत. त्यामुळे जुन्या मशीन्समध्ये आता तीन अंकी संख्या येतच नाहीये. त्यामुळे तिथल्या पेट्रोलची विक्री बंद केली गेली आहे. मात्र, अद्याप दिल्लीमध्ये अशी परिस्थिती नाहीये.

प्रमुख शहरांमध्ये असे आहेत भाव

शहर           डिझेल    पेट्रोल
दिल्ली          79.70    89.29
कोलकाता    83.29    90.54
मुंबई           86.72    95.75
चेन्नई           84.77    91.45


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petrol and diesel price hike 16 feb 2021