महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व 'पुलं'; जाणून घ्या पुलंच्या अष्टपैलू प्रतिभेबाबत

pl deshpande
pl deshpande

आज पु लं देशपांडे यांची 101 वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यकर्तृत्वाला उजाळा देत आज गुगलने त्यांचं डूडलदेखील बनवलं आहे. पुलं हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातलं एक मात्तबर नाव होतं. साहित्य, संगीत, नाट्य, अभिनय, चित्रपट आणि राजकारणातदेखील पुलंनी आपला ठसा उमटवला आहे. 

बहुआयामी व्यक्तीमत्व ते महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व
पु.ल.देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ भाई ऊर्फ पुलं यांचा जन्म मुंबईमध्ये 8 नोव्हेंबर 1919मध्ये झाला. ते लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, होते. त्यांनी एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत काम केले. गुळाचा गणपती, या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत.

'भाई' नावाचा चित्रपट

पु. ल. देशपांडे यांच्यावर मराठीत भाई हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाचे दोन भाग आहेत. गेल्यावर्षी यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनाचा आढावा घेणारा ‘भाई’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. भाई’ या आदरार्थी नावाने संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले ‘पुलं’ म्हणजे एक मिष्किल व्यक्तिमत्व होतं. त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशाह असेही म्हटलं जातं. 

पंडित नेहरुंची दुरदर्शनसाठी पहिली मुलाखत
पु. ल. देशपांडे यांनी अंमलदार, गुळाचा गणपति, घरधनी, चोखामेळा, दूधभात, देव पावला, देवबाप्पा, नवराबायको, नवे बिऱ्हाड, मानाचे पान आणि मोठी माणसे अशा अकरा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. १९३७पासून पुलंचा नभोवाणीशी संबंध आलाच होता. १९५५मध्ये पु.ल.देशपांडे 'आकाशवाणी'त (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले. ५६-५७ मध्ये ते आकाशवाणीवर प्रमुख नाट्यनिर्माता झाले. बदलीवर दिल्लीला गेले असताना त्यांनी व सुनीताबाईंनी ’गडकरी दर्शन‘ नावाचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमातूनच ’बटाट्याची चाळ’चा जन्म झाला. बटाट्याच्या चाळीला अभूतपूर्व लोकप्रियता लाभली. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. पु.ल.देशपांडे यांच्या साहित्यकृतींवर आजवर बरीच नाटके आणि चित्रपट झाले आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com