जम्मू-काश्मीरमधील मंदिरावर दहशतवादी हल्ल्याचा कट जवानांनी उधळून लावला

सकाळ ऑनलाइन टीम
Monday, 28 December 2020

कसून चौकशी केली असता दोघांनी हल्ल्याची कबुली दिली. अरी गावातील एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. त्यांच्याकडे एक मोबाइल आढळून आला. त्यात ग्रेनेडचा कसा वापर करायचा याची माहिती देणारा व्हिडिओ आढळून आला.

जम्मू- जम्मू-काश्मीर पोलिसांनी रविवारी सीमा भागातील पुंछ जिल्ह्यातील एका मंदिरावर हल्ला करण्याचा कट उधळला आहे. याप्रकरणी पाकिस्तानशी निगडीत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. पुंछचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक रमेशकुमार अग्रवाल म्हणाले की, अटक करण्यात आलेले दहशतवाद्यांनी पुंछ जिल्ह्यात शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्यांच्या म्होरक्याच्या इशाऱ्यावर एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचा कट रचला होता. शनिवारी रात्री आठच्या सुमारास मेंढर सेक्टरमधील बसूनीजवळ एका वाहनाची तपासणी करताना या कटाचा मागमूस पोलिसांना लागला. स्थानिक पोलिसांच्या एसओजीने 49 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांबरोबर मुस्तफा इक्बाल आणि मुर्तजा इक्बाल या दोन भावांना अटक केली. दोघेही गलहुटा गावचे रहिवासी आहेत. 

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बसूनीमध्ये 49 राष्ट्रीय रायफलच्या बटालियन मुख्यालयात त्यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी मुस्तफाला पाकिस्तानी नंबरवरुन फोन आला होता. त्यावेळी त्याला ग्रेनेड हल्ला करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. कसून चौकशी केली असता दोघांनी हल्ल्याची कबुली दिली. अरी गावातील एका मंदिरावर ग्रेनेड हल्ला करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. त्यांच्याकडे एक मोबाइल आढळून आला. त्यात ग्रेनेडचा कसा वापर करायचा याची माहिती देणारा व्हिडिओ आढळून आला. 

हेही वाचा- अंतर्गत राजकारणाचे रणनितीक दुष्परिणाम

अधिकाऱ्याने सांगितले की, मुस्तफा दहशतवादी कृत्यांत सहभागी होता आणि त्याच्या कबुलीनाम्याच्या आधारावर नियंत्रण रेषेजवळ बालाकोटे येथील डब्बी गावातून त्याचे दोन साथीदार मोहम्मद यासीन आणि रईस अहमदलाही पकडण्यात आले. आणखी एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नंतर तिघांना अटक करण्यात आली. तर मुर्तुजा इक्बाल पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे. तिघांच्या चौकशीत महत्त्वाचे पुरावे आढळून आले आहेत. मुस्तफाच्या घराची तपासणी करण्यात आली. त्याच्याकडे सहा ग्रेनेड, पाकिस्तानी चिन्ह असलेले फुगे आणि आतापर्यंत माहीत नसलेली दहशतवादी संघटना जे अँड के गझनवी फोर्सचे काही पोस्टर्स आढळून आली. अटक करण्यात आलेले सर्वजण पाकिस्तानातील आपल्या म्होरक्याच्या संपर्कात होते. त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी सूचना दिल्या जात होत्या. 

सुरक्षा दलाचे हे मोठे यश असल्याचे मानले जाते. धार्मिक भावना भडकवण्यासाठी रचलेला दहशतवादी कट त्यांच्या अटकेमुळे उधळण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे लष्कर आणि पोलिसांमधील योग्य समन्वयाने पार पडलेले हे संयुक्त अभियान होते, अशी माहिती जम्मूमधील लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले. पकडण्यात आलेले जम्मू-काश्मीर गझनवी फोर्सचे असू शकतात, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plot To Attack A Temple In Poonch In Jammu Kashmir Foiled 3 militant associates arrested