esakal | ‘ती’च्या कर्तृत्वाला देशाचा सलाम
sakal

बोलून बातमी शोधा

‘ती’च्या कर्तृत्वाला देशाचा सलाम

 कोट्यवधींचे ‘फॅन फॉलोइंग’ असणारे आपले ट्विटर अकाउंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रांतील सात कर्तृत्ववान महिलांना चालविण्यासाठी दिले. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे. यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरविलेल्या पुण्याच्या रश्‍मी ऊर्ध्वरेषे यांच्यासह विविध राज्यांतील १४ महिलांशी त्यांनी संवाद साधला व तुम्ही देशासाठी प्रेरणा ठरला आहात, असे गौरवोद्‌गार काढले.

‘ती’च्या कर्तृत्वाला देशाचा सलाम

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोट्यवधींचे ‘फॅन फॉलोइंग’ असणारे आपले ट्विटर अकाउंट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रांतील सात कर्तृत्ववान महिलांना चालविण्यासाठी दिले. निमित्त होते जागतिक महिला दिनाचे. यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते ‘नारीशक्ती’ पुरस्काराने गौरविलेल्या पुण्याच्या रश्‍मी ऊर्ध्वरेषे यांच्यासह विविध राज्यांतील १४ महिलांशी त्यांनी संवाद साधला व तुम्ही देशासाठी प्रेरणा ठरला आहात, असे गौरवोद्‌गार काढले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पंतप्रधानांनी आपले ट्विटर हॅंडल चालविण्यास दिलेल्या सात महिलांसह इतरांच्याही प्रेरक कथा जगासमोर आणण्याचा उद्देश होता. मोदींच्या ट्‌विटर हॅंडलवरून मालविका अय्यर यांनी सर्वप्रथम ट्‌विट केले. त्यांचे दोन्ही हात १३व्या वर्षीच निकामी झाले होते. परिस्थितीशी दोन हात केल्याशिवाय यश मिळत नाही, असे त्यांनी ट्‌विटमध्ये नमूद केले. यावेळी एका यूजरने चक्क पंतप्रधानांनाच पासवर्ड विचारला तेव्हा फूड बॅंकेच्या संस्थापक स्नेहा मोहनदास यांनी त्याला - नवा भारत... लॉग इनचा प्रयत्न करा, असे सणसणीत उत्तर दिले; त्याला असंख्य लाइक मिळाले. 

राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या १५ पैकी १४ कर्तृत्ववान महिलांशी मोदींनी दुपारी संवाद साधला. १०३ वर्षांच्या धावपटू मान कौर यांचे आशीर्वाद घेताना मोदींनी, तुम्ही खेलो इंडियातही होतात, अशी आठवण काढली. तर, ९६व्या वर्षी साक्षरता परीक्षेत अव्वल येणाऱ्या कार्तिकायनी अम्मा यांच्यासह या मिळून साऱ्याजणींना त्यांनी सांगितले की, तुम्ही जेव्हा तुमच्या तुमच्या भागांत काम सुरू केले तेव्हा एक मिशनच्या रूपात ते सुरू केले. तुम्ही कोणत्या पुरस्कारासाठी हे केलेले नाही; म्हणूनच तुम्ही देशासाठी प्रेरणा बनला आहात. 

पश्‍मीना शालींसह काश्‍मीरच्या वस्त्रोद्योगात महिलांचे योगदान वाढविणाऱ्या काश्‍मीरच्या आरिफा जान यांनी, मागच्या वर्षी इंटरनेट बंद झाल्याने आमचे सारे कष्ट वाया गेले, असे सांगण्याचे धाडस दाखविताच पंतप्रधानांनी हसत हसत, आता ते पुन्हा सुरू झाल्यावर तुमचा व्यवसाय आणखी कसा बहरतो ते बघा, असे उत्तर दिले. 

नौटंकी नको - येच्युरी
पंतप्रधानांनी महिला दिनानिमित्त आपले ट्विटर हॅंडल महिलांना चालविण्यास दिल्याच्या प्रयोगाचे सार्वत्रिक स्वागत झाले. त्याचवेळी काही विरोधाचे प्रखर स्वरही उमटले. माकप नेते सीताराम येच्युरी यांनी, मोदी यांनी अशी नाटके (नौटंकी) करू नयेत. त्यापेक्षा महिला आरक्षणाचे विधेयक सहा महिने संसदेत पडून आहे ते मंजूर करावे व महिलांबाबतचा आदर कृतीतून दाखवून द्यावा, असा टोला लगावला.