'लोकांना जीवाचं पडलंय अन् मोदींना प्रचाराचं'; वाराणसीमध्ये 'मोदी गमछा'चे वाटप!

Modi-Gamchha
Modi-Gamchha

वाराणसी : सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट आले असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीतून सर्व कारभार पाहत आहेत. केंद्रीय स्तरावरील मंत्री, अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत विविध राज्यांतील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. देशभरात लॉकडाऊनची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोदी त्यांच्या वाराणसी मतदारसंघातही गेले नाहीत. 

वाराणसीत सध्या काय परिस्थिती आहे, याचा आढावा त्यांनी फोनद्वारे घेतला आणि तेथे गमछे वाटण्याचे आदेश दिले. पंतप्रधान मोदींच्या आदेशाची लगेच सोमवारी (ता.१३) अंमलबजावणी करण्यात आली. वाराणसीमधील नागरिकांना मोदी गमछांचे वाटप करण्यात आले. यामुळे सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

गुरुवारी (ता.९) मोदींनी फोनद्वारेच काशीमधील परिस्थितीचा आढावा घेतला. वाराणसीमधील प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आणि महापौर यांना फोन लावत तेथील लॉकडाऊन दरम्यान असलेल्या परिस्थितीची माहिती घेतली. भाजप जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी लोकांसाठी मास्क बनविण्याचे काम सुरू असल्याबाबतची माहिती दिली. तेव्हा मोदींनी मास्कवर विनाकारण खर्च करू नका. उत्तर प्रदेशमधील लोक गमछाचा जास्त वापर करतात. त्यामुळे त्यांना गमछांचे वाटप करा. घरातून बाहेर पडताना ते गमछा तोंडाला बांधूनच बाहेर पडतील. 

"मास्क हे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहेत. गमछा ही काशी-वाराणसीची ओळख आहे. त्यामुळे मास्कऐवजी नागरिकांना गमछे द्या,'' असा आदेश पंतप्रधान मोदींनी भाजप जिल्हाध्यक्षांना दिला. मोदींच्या आदेशानंतर केसरवानी समाजातर्फे सोमवारी वाराणसीमध्ये गमछा वाटपाचे काम हाती घेण्यात आले होते. या गमछांवर 'मोदी गमछा' असे लिहले असून भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हही छापण्यात आले आहे. 

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आणि लॉकडाऊन वाढवायचा की नाही याबाबत मते जाणून घेतली. त्यावेळी स्वत: मोदींनीही आपल्या तोंडावर पांढऱ्या रंगाचा गमछा बांधला होता. मोदींनी गमछा बांधलेला पाहून अनेकांनी गमछा वापरण्यास सुरवात केली आहे.

मोदी गमछामुळे आता नेटकऱ्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. देशावर कोरोनाचे संकट असतानाही भाजप आपली जाहिरात करण्यात मागे राहिले नाही. संकटकाळातही भाजपला राजकारण सूचत आहे. जीव कसा वाचवायचा या विचारात लोक आहेत, तर प्रचार कसा करायचा या विचारात भाजप आहे, अशी सडेतोड टीका नेटकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com