'भारतीय चहाच्या बदनामीचं षड्यंत्र सहन केलं जाणार नाही' - PM मोदी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 February 2021

भारताला बदनाम करु इच्छिणारे लोक इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत की ते आता भारतीय चहाला देखील सोडत नाहीयेत.

गुवाहटी : भारतीय चहाला संपूर्ण जगामध्ये पद्धतशीररित्या बदनाम करण्याच्या षड्यंत्राबाबत तुम्ही बातम्यांमधून ऐकलं असेल. भारताला बदनाम करु इच्छिणारे लोक इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत की ते आता भारतीय चहाला देखील सोडत नाहीयेत. काही परकीय शक्ती या चहाशी निगडीत भारताच्या प्रतिमेला बदनाम करु इच्छित आहेत, अशी माहिती देणारे काही दस्ताऐवज अलिकडेच उघड झाले आहेत. काय आपण असा हल्ला स्विकारणार आहोत? या हल्ल्याला समर्थन देणाऱ्यांना स्विकारणार आहोत? अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममध्ये बोलताना केली. पंतप्रधान मोदी आज आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील ढेकीयजुली गावात 'आसाम मळा' कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

पुढे त्यांनी म्हटलं की, असे हल्ले करणाऱ्यांची स्तुती करणारी, त्यांना समर्थन देणारी लोकं तुम्हाला मान्य आहे का? याचं उत्तर प्रत्येकाला द्यावं लागेल. ज्यांनी ज्यांनी भारतीय चहाला बदनाम करण्याचं काम हाती घेतलं आहे आणि त्यांच्यासाठी इथं जे चिडीचूप बसले आहेत, त्या सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक चहा बागायतदार उत्तर मागणार आहे. तसेच भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्तीदेखील उत्तर मागेल.

मी आसामच्या भूमीवरून या कट रचणाऱ्या कारस्थानी लोकांना सांगू इच्छित आहे की त्यांनी हवी तेवढी कारस्थानं रचावीत पण भारत यांच्या चुकीच्या योजना कधीत यशस्वी होऊ देणार नाहीये. माझा प्रत्येक चहा कामगार ही लढाई जिंकून दाखवेल. भारतीय चहावर केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये एवढी ताकद नाहीये की ते आमच्या चहा बाग कामगारांचा सामना करू शकतील. असं देखील मोदी यांनी याठिकाणी बोलून दाखवलं.

पुढे मोदी यांनी म्हटलं की, मी आसामच्या लोकांना वचन देतो की, जेंव्हा आम्ही राज्यात सत्तेत येऊ तेंव्हा आम्ही इथे एक मेडिकल आणि टेक्निकल कॉलेज स्थानिक भाषेत उभं करु. हे माझं स्वप्न आहे की, प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या राज्याच्या मातृभाषेमध्ये एक तरी मेडीकल आणि टेक्निकल कॉलेज असायला हवे. 2016 पर्यंत आसाममध्ये फक्त 6 मेडीकल कॉलेज होते. गेल्या 5 वर्षांत, आम्ही आणखी 6 मेडीकल कॉलेजच्या उभारणीचं काम सुरु केलं आहे. उत्तर आसामची गरज लक्षात घेता बिस्वनाथ आणि चराईदेवमध्ये आम्ही आणखी दोन मेडीकल कॉलेजची पायाभरणी केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi in assam foreign powers are planning to attack India's identity associated with tea