देशाला मिळली दोन नवीन संरक्षण कार्यालयं, PM मोदींनी सांगितले फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशाला मिळली दोन नवीन संरक्षण कार्यालयं, PM मोदींनी सांगितले फायदे

देशाला मिळली दोन नवीन संरक्षण कार्यालयं, PM मोदींनी सांगितले फायदे

पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजधानी दिल्ली येथील दोन नवीन संरक्षण कार्यालयाचे उद्घाटन केलं. कस्तुरबा गांधी मार्ग आणि आफ्रिका अव्हेन्यू येथे 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'ची दोन संकुलं उभारण्यात आली आहेत. यासाठी 775 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून ७००० कर्मचारी काम करु शकतील एवढी कार्यालयांची क्षमता आहे. संरक्षण मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, गृह निर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि सशस्त्र दलाचे प्रमुख या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कर, नौदल, हवाई दल आणि नागरी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उपस्थिताना संबोधित केलं. यावेळी मोदी यांनी 'डिफेन्स कॉम्प्लेक्स'चे फायदे सांगितले. तसेच विरोधकांवर टीकास्त्रही सोडलं.

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'नवीन भारताच्या गरजा आणि आकांक्षांनुसार देशाची राजधानी विकसित करण्याच्या दिशेने आज आपण आणखी एक पाऊल टाकलं आहे. ही नवीन संरक्षण कार्यालये आपल्या दलांचे कामकाज अधिक सोयीस्कर आणि प्रभावी बनवण्याच्या प्रयत्नांना बळकट करणार आहेत. दोन्ही कार्यालये आधुनिक असून राष्ट्राच्या सुरक्षिततेशी संबंधित सर्व कामे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मदत करतील.' राजधानी देशाची विचारसरणी, दृढनिश्चय, शक्ती आणि संस्कृतीचं प्रतीक असते, असंही मोदी म्हणाले.

हेही वाचा: घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?- सुरेखा पुणेकर

संरक्षण मंत्रालयाचे कर्मचारी सध्या काम करत असलेल्या दिल्लीतील साऊथ ब्लॉकमध्ये असललेल्या वेगवेळ्या कार्यालयातील अनेक इमारती जुन्या झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या डिफेन्स कॉम्ल्पेक्समध्ये आता हे सर्व कर्मचारी स्थलांतरीत केले जाणार आहेत. दिल्लीतील कस्तूरबा गांधी मार्ग परिसरात ४,५२००० स्क्वेअर फुट क्षेत्रात आणि चाणक्यपुरी परिसरातील आफ्रीका एव्हेन्युमध्ये ५ लाख स्केअर फुट क्षेत्रात हे कार्यालयं तयार करण्यात आली आहेत.

नव्या संरक्षण कार्यालय संकुलाविषयी

नव्या संरक्षण कार्यालय संकुलात, संरक्षण मंत्रालय आणि लष्कर, नौदल, हवाई दलासह सशस्त्र दलांचे 7000 अधिकारी काम करतील. ही इमारत आधुनिक, सुरक्षित आणि कार्यात्मक स्थान पुरवणार आहे. इमारतीच्या कार्य व्यवस्थापनासाठी त्याचबरोबर दोन्ही इमारतींच्या संपूर्ण सुरक्षा आणि देखरेखीसाठी एकात्मिक आज्ञा आणि नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहे. नवे संरक्षण कार्यालय संकुल उर्जा समृध्द आणि समावेशक सुरक्षा व्यवस्थापन उपायांनी समृध्द आहे. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे एलजीएसएफ (लाईट गॉज स्टील फ्रेम) म्हणून ओळखले जाणारे नवे आणि शाश्वत बांधकाम तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळे पारंपारिक आरसीसी बांधकामाच्या तुलनेत बांधकामाचा काळ 24-30 महिन्यांनी कमी होतो. संसाधन समृध्द हरित तंत्रज्ञानाचा वापर इमारतीसाठी करण्यात आला असून पर्यावरण स्नेही पद्धतींना इथे प्रोत्साहन देण्यात आले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra Modi
loading image
go to top