esakal | गुजरात दंगलीनंतर मोदींच्या मुख्यमंत्रीपदावर आलेलं संकट आडवाणींमुळे टळलं होतं
sakal

बोलून बातमी शोधा

modi with advani

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आजपासून सेवा सप्ताह साजरा करत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे.

गुजरात दंगलीनंतर मोदींच्या मुख्यमंत्रीपदावर आलेलं संकट आडवाणींमुळे टळलं होतं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप आजपासून सेवा सप्ताह साजरा करत आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे एकमेव असे पंतप्रधान आहेत ज्यांचा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला आहे. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे त्यांचा ओढा होता. वयाच्या 17 व्या वर्षी अहमदाबादमध्ये आल्यानंतर त्यांनी आरएसएसचं सदस्यत्व घेतलं. त्यानंतर 1974 मध्ये ते आंदोलनात सहभागी झाले होते.

राजकारणात येण्याआधी अनेक वर्षे त्यांना आरएसएसमध्ये प्रचारक म्हणून काम केलं. मोदींनी 1980 च्या दशकात भाजपमध्ये प्रवेश केला. 1988-89 मध्ये ते गुजरात भाजपचे सरचिटणीस बनले. त्यावेळी मोदींनी लाल कृष्ण आडवाणी यांच्यासोबत 1990 मधील सोमनाथ आयोध्या रथ यात्रेच्या आयोजनात महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर मोदींवर भाजपने अनेक राज्यांच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली होती. 

गुजरातचे मुख्यमंत्रीपद
मोदी 1995 मध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव बनले. तसंच पाच राज्यांचे प्रभारीसुद्धा झाले. यानंतर 1998 मध्ये त्यांच्याकडे सरचिटणीसपद देण्यातं आलं. 2001 पर्यंत ते सरचिटणीस होते. 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवल्यानंतर मोदींकडे गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलं होतं. मोदींनी गुजरातचा कारभार हाती घेतल्यानंतर 5 महिन्यांनी गोध्रा हत्याकांड झालं. यात अनेक हिंदू कारसेवक मारले गेले. त्यानंतर फेब्रुवारी 2002 मध्ये गुजरातमध्ये दंगल उसळली. या दंगलीत शेकडो मुस्लिमांचा मृत्यू झाला.

आडवाणींनी वाचवली खुर्ची
तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरात दौरा केला तेव्हा मोदींना त्यांना राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता. अटल बिहारी वाजपेयी यांनी तेव्हा मोदींना हटवायला हवं होतं असंही म्हटलं होतं. पण आडवाणी मोदींच्या बाजुने धावून आले. गुजरात दंगलीनंतर सुरु कऱण्यात आलेल्या द्वेषाच्या एका मोहिमेचे ते बळी ठरले असं म्हणत आडवाणींनी मोदींची बाजू घेतली होती. गुजरात दंगलीवरून मोदींवर अनेक आरोप झाले. त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची चर्चा झाली. पण तत्कालीन उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणींनी त्यांना पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्री पदावर कायम राहिले.

सलग तीनवेळा गुजरातमध्ये भाजपचा विजय
मोदींविरोधात दंगलीवरून झालेले कोणतेच आरोप न्यायालयात सिद्ध झाले नाहीत. फेब्रुवारीत दंगल झाल्यानंतर डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींनी विजय मिळवला होता. पुढची पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर 2007 ची निवडणूकही त्यांनी जिंकली. सलग दोन टर्म पूर्ण केलेल्या मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये 2012 मध्येही सत्ता मिळवली होती. 

राष्ट्रीय राजकारणात
भाजपने 2009 मध्ये लाल कृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढली. पण युपीएने बाजी मारल्यानंतर आडवाणी भाजपमधून एका बाजुला पडले. त्याचवेळी इतर नेते पक्षात पुढे येत होते. त्यात नितिन गडकरी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांचा समावेश होता. दरम्यान, मोदींनी गुजरातमध्ये सलग दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक जिंकून वेगळी ओळख निर्माण केली होती. जेव्हा त्यांनी तिसऱ्यांदा विधानसभा जिंकली तेव्हा ते देशाच्या राजकारणात उतरणार अशी चर्चा सुरु झाली. मार्च 2013 मध्ये मोदींना भाजपच्या संसदीय बोर्डात नियुक्त करण्यात आलं आणि केंद्रीय निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे दिले. संसदीय बोर्डात असेलेले ते एकमेव मुख्यमंत्री होते.

2014 ची मोदी लाट 2019 मध्ये बनली त्सुनामी
2014 च्या लोकसभा निवडणुकीत बाजपनं मोदींचा चेहरा समोर करत निवडणूक लढली आणि तिथूनच मोदी युगाला सुरुवात झाली. मोदींच्या नेतृत्वाखाली देशात सत्ताबदल झाला. मोदी लाटेत युपीएची वाताहात झाली. भाजपने तब्बल 282 जागा जिंकल्या होत्या. तर मोदी वाराणसी आणि बडोदा या दोन मतदारसंघातून विजयी झाले होते. देशाचे 14 वे पंतप्रधान म्हणून त्यांनी 26 मे 2014 रोजी शपथ घेतली. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत मोदींची लाट त्सुनामीत बदलली होती. भाजपच्या जागा 300 च्या वर पोहोचल्या होत्या. एनडीएने ऐतिहासिक विजय मिळवला आणि मोदी पुन्हा पंतप्रधान झाले.