esakal | पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'
sakal

बोलून बातमी शोधा

pm modi birthday

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. 

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस भाजपकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र वेगळेच ट्रेंड दिसत आहे. रात्री 12 वाजल्यापासून #HappyBdayNaMo, #PrimeMinister #NarendraModiBirthday आणि #NarendraModi ट्रेंड होत आहे. मात्र यात एक ट्रेंड टॉपला आहे तो म्हणजे #NationalUnemploymentDay आणि #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस. मोदींच्या वाढदिवशीच हा ट्रेंड अचानक ट्विटरवर सुरु झाला आहे. सोशल मीडियावरून तरुणाई त्यांचा संताप अशा पद्धतीनं व्यक्त करताना दिसत आहे. 

सध्या भारतात कोरोनाचे संकट आहे. आधीच डबघाईला आलेली भारताची अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडली आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं तरुणांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. एनएसओच्या अहवालानुसार भारताच्या जीडीपीत 23.9 टक्क्यांची घसरण नोंदवली होती. जी गेल्या 40 वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. एवढंच नाही तर शहरातील बेरोजगारीचा दरही 8.32 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

लॉकडाउन आणि आर्थिक मंदीमुळे लाखो लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसायही ठप्प आहेत. लॉकडाऊन झाल्यानंतर एक महिन्यानंतर जवळपास 12 कोटी लोकांनी नोकरी गमावली असं सेंटर फॉर इंडियन इकॉनॉमीच्या अहवालातून समोर आलं आहे. यात असंघटीत कामगारांची संख्या मोठी असून संघटीत क्षेत्रातील लोकांची संख्या जवळपास दोन कोटी इतकी होती. 

बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असलेल्या भारतातील तरुणांनी आता त्यांची नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही आठवड्यात सोशल मीडियावर असे अनेक ट्रेंड सोशल मीडियावर आले होते. वेळेत परीक्षा न होणं, निकालातील गोंधळ, सरकारी नोकरभरती न केल्यानं सरकारविरोधात तरुणाई सोशल मीडियावर निषेध करत आहे. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी लवकर पदभरती करावी अशी मागणी केली आहे. तसंच परीक्षा झाल्यानंतर त्याच्या निकालात होणारी दिरंगाई कमी करण्यासाठीही वेगळी मोहीम चालवली गेली. अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांकडून आकारल्या जाणाऱ्या अवाजवी शुल्काविरोधातही तरुणांनी आवाज उठवला आहे. 

याआधी 9 सप्टेंबरला देशातील अनेक भागात तरुणांनी रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी बॅटरी, मोबाइल फ्लॅश आणि दिवे लावून त्यांचा विऱोध दर्शवला होता. याच मोहिमेनंतर आता मोदींच्या वाढदिवसाला अनेक विद्यार्थी संघटनांनी 17 सप्टेंबरला #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेंड सुरु केला. याला अनेक विरोधी पक्षांसह वेगवेगळ्या संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपचे आयटीसेल प्रमुख मालविय यांनी केला आहे.