'स्वार्थी राजकारणामुळे आदिवासी समाज दुर्लक्षित', मोदींचा काँग्रेसवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM-Narendra-Modi

'स्वार्थी राजकारणामुळे आदिवासी समाज दुर्लक्षित', मोदींचा काँग्रेसवर निशाणा

भोपाळ : ''काही राजकीय पक्षांनी आदिवासी समाजाला सर्व सुविधांपासून कसे दूर ठेवले हे मी आधीपासून पाहत आलोय. आदिवासी समाजाची सर्व समस्यांपासून सुटका करण्यासाठी त्यांनी मते मागितली. ते सत्तेवर आले. पण, ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतर देशावर अनेक दशकं राज्य करणाऱ्यांनी स्वार्थी राजकारणाला प्राधान्य दिल्याने आदिवासी समाज दुर्लक्षित आहे'', असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. आज मध्यप्रदेशात जनजातीय गौरव दिवस महासम्मेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: नातेवाईक स्वीकारणार मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार

भारत आज पहिला जनजातीय गौरव दिवस साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि त्यांचे स्वातंत्र्यलढा आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचे अभिमानाने स्मरण व सन्मान करण्यात येत आहे, असेही मोदी म्हणाले.

''राष्ट्र उभारणीमध्ये आदिवासी समाजाच्या योगदानाबाबत चर्चा करतो त्यावेळी अनेकांना आश्चर्य वाटते. भारतीय संस्कृती बळकट करण्यासाठी आदिवासी समाजाचा महत्वाचा वाटा आहे, यावर त्यांना विश्वास बसत नाही. कारण याबाबत देशातील जनतेला कधीच माहिती दिली नाही. याबाबत जनतेला अंधारात ठेवण्यात आले. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्यांनी स्वार्थी राजकारणाला प्राधान्य दिल्याने हे घडले. भारताच्या लोकसंख्येच्या १० टक्के आदिवासींची लोकसंख्या असूनही आदिवासी समाजाची संस्कृती आणि क्षमता नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे'', असे मोदी म्हणाले.

''आदिवासी समाजाच्या समस्या, शिक्षण, आरोग्य याबाबत आधीच्या सरकारला काहीही देणं-घेणं नव्हतं. काही राजकीय पक्षांनी आदिवासी समाजाला सर्व सुविधांपासून कसे वंचित ठेवले हे मी पाहत होतो. सर्व मुद्द्यांपासून सुटका करून घेण्यासाठी मते मागितली. ते सत्तेवर आले पण ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या केल्या नाहीत'', अशी टीकाही मोदींनी केली.

बाबासाहेबांना वाहिली श्रद्धांजली -

''मला प्रख्यात इतिहासकार आणि पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचेही स्मरण करायचे आहे. त्यांचे निधन झाल्याचे मला आज सकाळी समजले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत नेण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी जे आदर्श जगासमोर मांडले, तेच आदर्श आपल्याला मार्गदर्शन करत राहतील'', असे म्हणत मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली.

loading image
go to top