नातेवाईक स्वीकारणार माओवादी मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

milind teltumbde

नातेवाईक स्वीकारणार मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार

वणी (जि. यवतमाळ) : महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर शनिवारी माओवादी व पोलिसात झालेल्या चकमकीत नक्षल्यांचा (gadchiroli naxal encounter) खात्मा करण्यात आला. यात नक्षल कमांडर मिलिंद तेलतुंबडेचा (Milind Teltumbe) समावेश आहे. नातेवाईक त्याचा मृतदेह स्वीकारणार असून लालगुडा परिसरात आज दुपारी नातेवाईकांच्या समक्ष अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा: इंजिनिअरिंग झालेला तेलतुंबडे नक्षलींचा देशातला सर्वात मोठा नेता

माओवादी छत्तीसगडमधून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवादी विरोधी पथकाने या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले. याच दरम्यान जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाली. शनिवारी सकाळी ग्यारापत्तीच्या जंगलात पोलिस आणि माओवादी यांच्यात चकमक सुरू झाली होती. यावेळी तब्बल 26 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईमध्ये मिलिंद तेलतुंबडेसह जोगन्ना, विजय रेड्डी, संदीप दीपकराम यांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही नक्षल चळवळीचे प्रमुख होते.

मिलिंद तेलतुंबडे हा वणी तालुक्यातील राजुरा( इजारा) येथील निवासी होता. मात्र, तो मागील 25 वर्षांपासून नक्षल चळवळीत सामील झाल्यामुळे गावी परतला नव्हता. मिलिंद तेलतुंबडेची पत्नी प्राध्यापक असून त्या नागपूरला राहतात. मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करावे? असा प्रश्न तेलतुंबडेच्या पत्नीसमोर होता. वणीतील नातेवाईकांनी पुढाकार घेत वणीलगत असलेल्या लालगुडा परिसरात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.

लालगुडा येथे तेलतंबुडेच्या मृतदेहावर सोमवारी दुपारी नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज सकाळी मिलिंद तेलतुंबडेचे नातेवाईक गडचिरोलीला रवाना झाले आहेत. कागदोपत्री पूर्तता करून पोलिस प्रशासन तेलतुंबडेचा मृतदेह नातेवाईकांना सोपवणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.

loading image
go to top