पुन्हा 26/11 चा कट रचत होते दहशतवादी? PM मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 2008 साली 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. लश्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये 166 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव आणि गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नगरोटा एन्काउंटर झाल्यानंतर त्याबाबत ही बैठक घेण्यात आली. दहशतवादी 26/11 हल्ल्याला 12 वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका हल्ल्याची तयारी करत होते असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. गुरुवारी झालेल्या चकमकीमध्ये 4 दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात सुरक्षा बलांना यश आलं होतं. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमध्ये नगरोटामध्ये ठार करण्यात आलेले दहशतवादी हे 26/11 सारखाच हल्ला करण्याचा कट रचत होते. गुरवारी सकाळी दहशतवादी फळांच्या ट्रकमध्ये लपून जात होते. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनंतर सुरक्षा दलाने दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. 

जम्मू काश्मीरमध्ये नगरोटा इथं बन टोल प्लाझावर चेकिंगवेळी सुरक्षा दलाने चार दहशतवाद्यांना ठार केलं होतं. दहशतवादी एका ट्रकमध्ये लपून येत होते. त्यंना चेकिंगवेळी रोखण्यात आल्यानं गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने ट्रक स्फोटकांनी उडवून दिला. त्यानंतर दहशतवादी जंगलाच्या दिशेना पळाले. तीन तास चाललेल्या शोध मोहिमेत सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

हे वाचा - पाकचा डाव उधळून लावण्यासाठी लष्कराची आक्रमक मोहिम

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये 2008 साली 26 नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला झाला होता. लश्कर ए तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये 166 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi high level meeting with amit shah and ajit doval