esakal | पाकचा डाव उधळून लावण्यासाठी लष्कराची आक्रमक मोहिम 
sakal

बोलून बातमी शोधा

पाकचा डाव उधळून लावण्यासाठी लष्कराची आक्रमक मोहिम 

दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवरील भारतीय ठाण्यांवर आणि विशेषत: नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला जात आहे.

पाकचा डाव उधळून लावण्यासाठी लष्कराची आक्रमक मोहिम 

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - हिवाळ्याच्या आत भारतात शक्य तितके दहशतवादी घुसविण्याचे पाकिस्तानी सैन्याचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी भारतीय लष्करातर्फे पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवाद्यांच्या संशयित लाँचपॅडवर लक्ष्यभेदी हल्ले केले जात आहेत. आजही जम्मूत झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या कारस्थानांचा ताजा पुरावा मानला जात आहे. या हल्ला जवानांनी उधळून लावत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

दहशतवादी संघटनांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘एफएटीएफ’च्या करड्या यादीतून बाहेर येण्यासाठी आणि त्याचवेळी जम्मू-काश्‍मीरमध्ये अशांतता कायम ठेवण्याच्या उद्देशाने दहशतवादाला पाठबळ देण्याचे धोरण कायम ठेवण्यासाठी पाकिस्तान धडपडत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. दहशतवाद्यांना भारतात घुसविण्यासाठी गेल्या काही आठवड्यांपासून पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवरील भारतीय ठाण्यांवर आणि विशेषत: नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा मारा केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये यावर्षी आतापर्यंत २१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या प्रयत्नांना वेसण घालण्यासाठी भारतीय लष्करानेही ‘सर्जिकल स्ट्राइक’ सुरु केले आहेत. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर पाकव्याप्त काश्‍मीरमधील पाकिस्तानी आणि इतर विदेशी दहशतवाद्यांना अचूकपणे लक्ष्य केले जात आहे. या मोहिमांमध्ये प्रचंड अचूकता असून दहशतवाद्यांव्यतिरिक्त इतर कोणाचेही नुकसान झालेले नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पाकिस्तानने गेल्या आठवड्यात उत्तर काश्‍मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात पाच जवान हुतात्मा झाले होते, तर चार नागरिक मृत्युमुखी पडले होते. याला प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांचा मारा करत पाकिस्तानचे बंकर्स नष्ट केले. यात त्यांचे आठ सैनिकही मारले गेले. 

पाकचा डाव 
दहशतवादी हल्ल्यांचे धागेदोरे आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणारा दबाव कमी व्हावा म्हणून पाकिस्तान सध्या जम्मू-काश्‍मीरमधील युवकांनाच चिथावणी देण्याची खेळी खेळत आहे. सोशल मीडियावर बनावट नावाने खाते उघडून प्रचार केला जात आहे. तसेच, सीमेवरील गावांवर हल्ले होत आहेत. भारताच्या कारवाईत मारल्या गेलेले दहशतवादी हे निष्पाप नागरिक असल्याची बतावणी करून पाकिस्तान जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, पाकव्याप्त काश्‍मीरमधील आणि सीमेपलिकडील दहशतवाद्यांच्या तळांना पाकिस्तानी सैन्याचे मोठे संरक्षण दिले जात आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताची योजना 
चिथावणीमुळे चुकीच्या मार्गाला लागलेल्या काश्‍मीरी युवकांना त्यांच्या पालकांच्या मदतीने मूळ प्रवाहात आणण्याचे भारतीय लष्कराचे प्रयत्न सुरु असून यात यशही येत आहे. पाकिस्तानी आणि इतर विदेशी दहशतवाद्यांबाबत गुप्तचरांकडून माहिती मिळवून त्यांना अचूक टिपले जात आहे. 

loading image