PM मोदींच्या दौऱ्यासाठी Air India-1 ही विशेष विमाने; सुरक्षेसाठी आहेत 'या' तरतुदी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 28 November 2020

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाची आवश्यकता भासू लागली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज कोरोना विषाणूवर भारतात विकसित केल्या जाणाऱ्या तीन लशींच्या कंपन्यांना भेट देणार आहेत. लशीचा विकास आणि तिच्या  निर्मितीची प्रक्रिया याबाबतची माहिती ते घेणार आहेत. यामध्ये ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, हैद्राबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत. त्यांच्या या भेटीसाठी पुणे प्रशासनाकडून सुरक्षेबाबतची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पुणे पोलिसांसह विशेष सुरक्षा दलावर ही जबाबदारी असणार आहे. त्यांच्या पुण्यातील दौऱ्यासाठी बोईंग 777 ही दोन विमाने दाखल झालीयत. त्यांचं नामकरण एअर इंडिया वन असं करण्यात आलं आहे. या विशेष विमानाने ते पुण्यात येणार आहेत, अशी माहिती आहे. 

पुणे दौऱ्यात झाला बदल 

पंतप्रधान मोदींच्या समवेत 100 देशांचे राजदूत या पाहणीच्या दौऱ्यात समाविष्ट आहेत. आधीच्या वेळापत्रकानुसार दुपारी 1 ते 2 या वेळात सीरम इन्स्टिट्युटमध्ये येणार होते, मात्र काही कारणास्तव दौऱ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. नव्या वेळापत्रकानुसार मोदी दुपारी 3:50 ला पुणे विमानतळावर येणार आहेत . त्यानंतर 3:55 वाजता हेलिकॉप्टरने मांजरीकडे रवाना होतील. हेलीपॅडमधून 4:15 वाजता सीरममध्ये जातील.

विशेष सुरक्षा दलाची गरज

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाची आवश्यकता भासू लागली. आणि म्हणून या दलाच्या स्थापनेची प्रक्रिया केली गेली. यासाठी बिरबलनाथ समितीची स्थापना 18 फेब्रुवारी 1985 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने केली. या समितीकडून स्पेशल प्रोटेक्श युनिटच्या स्थापनेबाबतचा प्रस्ताव मांडला गेला. यासाठी राष्ट्रपतींनी 30 मार्च 1985 रोजी कॅबिनेट सचिवालयाला याची मान्यता दिली. याअंतर्गत 819 पदांच्या निर्मितीला मान्यता मिळाली. भारतीय संसदेच्या एका अधिनियमानुसार 2 जून 1988 रोजी स्पेशल प्रोटेक्शन (एसपीजी) ग्रुपची स्थापना करण्यात आली. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यापासून महत्त्वाच्या व्यक्तीचे संरक्षण करण्यासाठी एसपीजीमधील कमांडो तत्पर आणि सक्षम असतात. त्यांचे कठोर प्रशिक्षण घेऊन त्यांच्याकडे आधुनिक हत्यारे, गाड्यांचा ताफा इत्यादी गोष्टी असतात. डायरेक्टर जनरल दर्जाचा एक आयपीएस अधिकारी या दलाचा प्रमुख असतो. दिल्लीमध्ये पंतप्रधान निवास स्थानात त्यांचे कार्यालय आहे. 

प्रवासी दौऱ्यासाठी विशेष सुसज्ज विमाने

आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोन महत्त्वाची पदे मानली जातात. त्यांच्यासाठी म्हणून देशातील आणि परदेशातील प्रवासासाठी बोईंग 777 ही दोन विमाने खरेदी करण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात त्यांचा समावेश आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या प्रवासासाठी एअर फोर्स वन ही विमाने आहेत. यामध्ये सर्वप्रकारच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा समाविष्ट आहेत. अगदी याच पद्धतीने एअर इंडिया वन या विमानातही सुरक्षा तैनात आहे. ही विमाने जवळपास 8 हजार 400 कोटी रुपये किंमतींची आहेत. याच विमानाने मोदी पुण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi protection Special Protection Group air india 1 aero plane these are some Provisions