
येत्या काही महिन्यातच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अटल बिहारी वाजपेयीजींच्या जयंत्तीनिमित्त पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 6 राज्यांतील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यांनी आज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 18 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. यावेळी त्यांनी म्हटलंय की, पश्चिम बंगालमधील 70 लाखांहून अधिक शेतकरी हे या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीयेत. कारण बंगालमधील ममता सरकारच्या राजकारणामुळे हे शेतकरी वंचित राहिलेले आहेत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. येत्या काही महिन्यातच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.
Mamata Banerjee's ideology has destroyed Bengal. Her actions against the farmers have hurt me a lot. Why is the Opposition quiet on this?: PM Modi https://t.co/TCwIqEXXhs
— ANI (@ANI) December 25, 2020
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, बंगालचे शेतकरी केंद्राच्या योजनांच्या फायद्यांपासून वंचित राहिलेले आहेत. बंगाल हे एकमेव असे राज्य आहे जे या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीये. ममता बॅनर्जी यांच्या विचारधारेमुळे बंगाल उद्ध्वस्त झाला आहे. त्यांच्या शेतकरी विरोधी कृत्यांमुळे मी खुप दुखावलो आहे. यावर विरोधक का गप्प आहेत? असा सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा - 'विरोधक दिशाभूल करताहेत; MSP ची व्यवस्था तशीच राहिल'
गेल्या एक महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर प्रामुख्याने पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे. तीन कृषी कायदे रद्द व्हावेत या एकाच मागणीसाठी ते आंदोलन करताहेत. या पार्श्वभूमीवरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह डाव्या पक्षांवर निशाणा साधला आहे.
मोदी म्हणाले की, जेव्हापासून ही योजना सुरु झाली तेंव्हापासून 1 लाख 10 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. मात्र या गोष्टीचं मला वाईट वाटत आहे की, एकमेव पश्चिम बंगालमधील 70 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत. केवळ राजकीय विचारधारेमुळे त्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांपूर्वीची भाषणे ऐकली तर समजेल की त्यांच्या राजकीय विचारधारेमुळे बंगालचेच किती नुकसान झाले आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, जर शेतकऱ्यांसाठी हृदयात एवढंच प्रेम होतं तर मग शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांना शेतकरी सन्मान योजनेचे पैसै मिळावेत म्हणून विरोधकांनी आंदोलन का केले नाही? यापूर्वी कधीच आवाज न उठवता आज थेट पंजाबला पोहोचलात?
पुढे मोदी यांनी म्हटलंय की, हे स्वार्थाच्या राजकारणाचे एक प्रमुख उदाहरण आहे. जे लोक पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांच्या हितासाठी काही बोलत नाहीत ते इथे दिल्लीत नागरिकांना त्रास देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर देशाचे अर्थकारण बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याठिकाणी फोटो काढण्यापेक्षा केरळमध्ये आंदोलन करा आणि तिथे MSP सुरु करा. हा दुटप्पीपणा बंद करा, असंही मोदींनी म्हटलं आहे.