दिल्लीत नवा होतो तेव्हापासून मुखर्जींनी मार्गदर्शन केलं; मोदींनी उलगडला स्नेहबंध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली.

नवी दिल्ली - देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून प्रणव मुखर्जींसोबतचे फोटो शेअर करत शोक व्यक्त केला. देशाच्या विकासात त्यांनी वेगळी छाप सोडली असल्याचं मोदी म्हणाले. गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर म्हटलं की, प्रणवदा यांची कारकिर्द संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ट्विट केली असून त्यात म्हटलं की, प्रणव मुखर्जींनी राष्ट्रपती भवनाला सर्वासामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. 2014 ला दिल्लीत नवीन असताना पहिल्या दिवसापासून प्रणव मुखर्जी यांचं मार्गदर्शन, पाठिंबा आणि आशीर्वाद मिळाले असं मोदी म्हणाले. मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा प्रणव मुखर्जी राष्ट्रपती होते. 

मोदी म्हणाले की, 2014 ला मी दिल्लीत नवीन होतो. पहिल्या दिवसापासून मला प्रणव मुखर्जी यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं. त्यांच्यासोबत घालवलेले क्षण नेहमच आठवणीत राहतील.

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केलं आहे. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर त्यांनी श्रद्धांजली वाहिली. कुटुंबियांसह नातेवाइकांच्या दु:खात सहभागी असल्याचं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय 84) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती खालावली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मुखर्जी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज, त्यांची प्राणज्योत मालवली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm modi share memories about former president pranab mukharjee