
PM मोदींना कोरोना काळातील कामासाठी नोबेल शांतता पुरस्कार द्या : BSE प्रमुख
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य प्रकारे कोरोनाचा काळ हाताळला. त्यामुळे देशातील कोविड व्यवस्थापनाच्या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदींना नोबेल शांतता पुरस्कार देण्यात यावा, असं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान म्हणाले. कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) येथे शुक्रवारी दीक्षांत समारंभात ते बोलत होते.
मोदी सरकारने कोरोना काळात ८० कोटी लोकांना मोफत रेशन उपलब्ध करून दिले. संयुक्त राष्ट्राच्या जागतिक अन्न संस्थेने केलेल्या कामापेक्षा खूप मोठं काम आहे. या कार्यक्रमाला नोबेल देण्यात आले होते. आम्हाला अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याबदद्ल आम्ही सरकारचे आभारी आहोत. मोदी सरकार मोठे कार्य करत आहे. अजून जगाला त्याची ओळख झालेली नाही, असं बीएसई प्रमुख म्हणाले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून गरीबांना मोफत रेशन देण्यात आले. त्यामुळे अनेक भारतीय नागरिकांना अराजकता आणि दुःखापासून वाचवले आहे. दोन वर्षांहून अधिक काळ मोफत अन्न पुरविलेल्या लोकांची संख्या संपूर्ण युरोप किंवा यूएसए, मेक्सिको आणि कॅनडा किंवा सर्व दक्षिण अमेरिकन देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे, असंही चौहान म्हणाले.
गेल्या २०२० मध्ये यूएन वर्ल्ड फूड प्रोग्राम (WFP)ला नोबेल शांतात पुरस्कार मिळाला. त्यांनी फक्त ११.५५ कोटी लोकांना आंशिक मदत केली होती. पण, भारताने ८० कोटी लोकांना रेशन पुरवले आहे. याचा अर्थ काय? नोबेल शांतता पुरस्कार समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या मानतावादी कामगिरीचा गांभीर्यानं विचार करावा, असंही चौहान म्हणाले.