
देशात कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदी G-7 परिषदेला जाणार नाहीत
नवी दिल्ली - जून महिन्यात होणाऱ्या जी 7 (G-7 Summit) शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सहभागी होणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. देशातील कोरोनाची (Corona) परिस्थिती अत्यंत गंभीर असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. जी 7 देशांची बैठक 11 ते 13 जून या कालावधीत कार्नवॉल इथं आयोजित करण्यात येणार आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं की, जी7 शिखर परिषदेत खास प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदींना आमंत्रित केल्याबद्दल ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आभार. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं पंतप्रधान मोदी स्वत: या शिखर परिषदेला उपस्थित राहू शकणार नाहीत.
हेही वाचा: बारा वर्षांपुढील सर्वांचे अमेरिकेत आता लसीकरण
जी 7 म्हणजेच ग्रुप ऑफ सेव्हनमध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, अमेरिका आणि ब्रिटनसह युरोपीय संघाचा समावेश आहे. जी 7 समुहाचे अध्यक्ष असलेल्या ब्रिटनने भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना आमंत्रण दिलं आहे.
कोरोनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा परदेश दौरा रद्द झाला आहे. याआधी परराष्ट्र मंत्रालयाने मोदींचा पोर्तुगाल दौरा रद्द झाल्याची माहिती दिली होती. पंतप्रधान मोदी हे भारत-युरोपीय संघाच्या शिखर परिषदेत सहभागी होणार होते. ही शिखर परिषद डिजिटल माध्यमातून झाली होती.
हेही वाचा: इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात भारतीय महिलेचा मृत्यू
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हेसुद्धा भारत दौऱ्यावर येणार होते. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांनीही भारत दौरा रद्द केला होता. यानंतर चार मेरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉन्सन यांनी डिजिटल माध्यमातून बैठक घेतली होती.
Web Title: Pm Modi Will Not Attend G7 Summit Says
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..