
जालंधर : ‘‘दहशतवादाविरोधात आम्ही लक्ष्मण रेषा आखली असून आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर ही आमच्यासाठी सामान्य बाब आहे. पाकिस्तानमध्ये कोठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाही, घरामध्ये घुसून त्यांना ठेचले जाईल,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे काढले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पाठीवर खुद्द पंतप्रधानांनी शाबासकीची थाप दिली आहे. आदमपूर येथील हवाई तळास भेट देत मोदी यांनी जवानांशी संवाद साधला.