
नवी दिल्ली : सलग तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत सत्ता स्थापन केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजिबात कमी झालेला नाही, असे निरीक्षण 'द मॅट्रिझ'च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. महाराष्ट्र व हरियाना या दोन राज्यांत भाजपने मिळवलेल्या यशात मोदी यांच्या लोकप्रियतेचा मोठा वाटा होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण प्रत्यक्षात २४० जागांवरच समाधान मानावे लागले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा कमी झाल्याची टीका विरोधकांनी सुरु केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाना व महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दणदणीत यश मिळाले. या दोन निवडणुकांमध्ये कोणते घटक प्रभावी ठरले, यासंदर्भात 'द मॅट्रिझ'ने तपशीलवार सर्वेक्षण केले.