esakal | लोकांमध्ये जा, जागृती करा! 
sakal

बोलून बातमी शोधा

modi

कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जाणीव जागृती करावी,  असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

लोकांमध्ये जा, जागृती करा! 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - सत्तारूढ भाजपच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये जाऊन प्राणघातक कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत जाणीव जागृती करावी,  असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

संसदीय अधिवेशनातील सदस्यांच्या अल्प उपस्थितीबद्दलही त्यांनी खासदारांना कानपिचक्‍या दिल्या. संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशन कमी करण्यास मोदी सरकारने नकार दिल्याने ३ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनासाठी खासदारांसमोर दिल्लीत थांबायचे की पंतप्रधानांच्या आदेशानुसार कोरोना जागृतीसाठी मतदार संघांत जायचे, असा पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. 

भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधानांच्या भाषणाआधी कोरोनाच्या हाहाकाराबाबत आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सादरीकरण केले. कोरोनाचा देशातील फैलाव रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर सातत्याने सुरू असलेले उपाय, कोरोनाच्या संसर्गापासून व्यक्तिगत व सामाजिक स्तरावर प्रत्येकाने घ्यायची काळजी आदींबाबत आरोग्यमंत्र्यांनी विस्ताराने माहिती दिली. कोरोनाच्या साथीबद्दल जनजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यमांसह रुग्णालये, डॉक्‍टर , परिचारिका आदींच्या कठोर मेहनतीची मोदींनी प्रशंसा केली. या बैठकीनंतर पत्रकाराशी बोलताना संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही अधिवेशनाचा काळ करोनाच्या धास्तीने कमी करण्याची शक्‍यता फेटाळली. 

सूत्रांच्या माहितीनुसार मोदींनी सांगितले की, ‘‘ जेव्हा देशासमोर आरोग्याबाबतचे गंभीर आव्हान आहे त्या काळात खासदारांनी कार्यरत राहिले पाहिजे.  हे आव्हान मोठे आहे म्हणून सरकार व शासनाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी (खासदार) आव्हानापासून पलायन करणे योग्य नाही.’’ 

मोदींचा सल्ला ‘त्यांना’
कोरोना हे आरोग्याबाबतचे प्रचंड मोठे आव्हान आहे. कारण, भारतासारख्या देशात संसाधनांची तुलनेने कमतरता आहे. त्यामुळेच या आव्हानाचा मुकाबला एकजुटीने करू, असे सांगून मोदी म्हणाले की, खासदारांनी छोट्या- छोट्या गटांमध्ये जाऊन कोरोनाबाबत जागरूकता निर्माण करावी. १५ एप्रिलपर्यंत कोणतेही आंदोलन किंवा विरोध-निषेध प्रदर्शनांपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिल्याचे समजते. शनिवारी व रविवारी जे खासदार मतदारसंघांत जातात; खासकरून त्यांच्यासाठी मोदींचे हे आव्हान होते, असे बैठकीला उपस्थित असलेल्या एका खासदाराने सांगितले.