मोदींचा चीनला अप्रत्यक्ष इशारा; लष्कर प्रमुख अन् CDS अधिकाऱ्यांसह गाठले लेह

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 3 जुलै 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी या भागात तैनात असलेल्या लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहेत. 

लेह : वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वरील तणावपूर्ण वातावरणात  पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी अचानक लेहला पोहचले आहेत. त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे जनरल बिपीन रावत आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे हे देखील उपस्थितीत आहेत. लडाखमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांचे मनोबल वाढविण्यासाठी मोदींनी अचानकपणे केलेल्या या दौऱ्यातून चीनला अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे.   15 जून रोजी गलवान खोऱ्यात घडलेल्या घटनेनंतर भारत-चीन यांच्यातील तणाव वाढला आहे.  गलवान खोऱ्यात भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सीडीएस रावत यांच्यासोबत लेह दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. पण अचानकपणे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भागात तैनात असलेल्या लष्कर, हवाई दल आणि आयटीबीपीच्या जवानांशी संवाद साधणार आहेत. 

रशियाकडून मिळणार सुखोई अन्‌ मिग विमाने;संरक्षण साहित्य खरेदी समितीकडून मान्यता

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नीमू येथील पोस्टवर जाऊन  लष्करी आणि वायुसेनेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यापूर्वी याठिकाणी केवळ  CDS बिपिन रावत येणार होते. मात्र मोदींनी अचानक याठिकाणी भेट देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मागील दोन महिन्यांपासून भारत-चीन यांच्यात तणावपूर्ण वातावरण आहे. वादग्रस्त मुद्यावर चर्चेतून शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी चिनी सैन्यासोबत तसेच राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु आहे. नीमू पोस्ट समुद्रसपाटीपासून 11 हजार फूट उंचीवर आहे. जगातील सर्वाधिक उंचीवर असलेली पोस्ट म्हणून नीमू पोस्ट ओळखली जाते. याठिकाणी अचानक भेट देत मोदींनी 14 कॉर्प्सच्या अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी दक्षिण लष्करी कमांडचे लेफ्टनंट जनरल वायके जोशी, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह देखील उपस्थितीत होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi Chief of Defence Staff General Bipin Rawat and Army Chief MM Naravane visit to Ladakh