रशियाकडून मिळणार सुखोई अन्‌ मिग विमाने;संरक्षण साहित्य खरेदी समितीकडून मान्यता

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 जुलै 2020

राजनाथसिंह यांनी रशिया दौऱ्यात ‘एस-४००’क्षेपणास्त्र यंत्रणा तसेच संरक्षण साहित्याच्या सुट्या भागांचा पुरवठा वेळेआधी केला जावा,असे रशियाला सांगितले होते.अत्याधुनिक ३३ लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत

नवी दिल्ली - चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही सीमेवरील आपले बळ आणखी वाढविले असून सैन्यदलांसाठी अत्याधुनिक संरक्षण साहित्य खरेदीला वेग दिला आहे. नव्या धोरणानुसार भारताने रशियाकडून ३३ लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा संरक्षण व्यवहार १८ हजार १४८ कोटी रुपयांचा असेल.

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण साहित्य खरेदी समितीच्या (डीएसी) बैठकीत या खरेदी प्रस्तावांना आज मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी आज दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर या संरक्षण साहित्य खरेदी व्यवहाराची घोषणा करण्यात आली. या व्यवहारामुळे भारत आणि रशियाचे सामरिक संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. मागील आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी रशिया दौऱ्यात ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा तसेच संरक्षण साहित्याच्या सुट्या भागांचा पुरवठा वेळेआधी केला जावा, असे रशियाला सांगितले होते. आता अत्याधुनिक ३३ लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. पिनाका रॉकेट लाँचरचा दारूगोळा तसेच युद्धभूमीसाठी उपयुक्त वाहनांचे आधुनिकीकरण केले जाईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यांची खरेदी 
२१  - मिग-२९ 
...... 
१२ - सुखोई -३० 
...... 
५९ -  मिग -२९चे आधुनिकीकरण 
......... 
३८ हजार ९०० कोटी - संरक्षण साहित्य खरेदी प्रस्तावांना सरकारची मंजुरी 
...... 
३१ हजार १३० कोटी -  देशांतर्गत उद्योगांकडून खरेदी 

नौदलास बळ 
या व्यतिरिक्त संरक्षण मंत्रालयाने हवाई दल तसेच नौदलासाठी देखील हवेतून हवेत मारा करणारी दीर्घ पल्ल्याची २४८ एक्स्ट्रॉ बियॉन्ड व्हिज्युअल क्षेपणास्त्रे खरेदीसाठी देखील मंजुरी दिली आहे. तर यासोबतच डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) विकसित करत असलेल्या एक हजार  किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असलेल्या क्रुज क्षेपणास्त्राच्या आराखड्यालाही मंजुरी मिळाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महासागरात गस्त 
लडाखमध्ये चिनी घुसखोरीनंतर १५ आणि १६ जूनला झालेल्या हिंसक झटापटीत वीस भारतीय जवानांना हौतात्म्य प्राप्त झाल्यानंतर ताबा रेषेवर वाढलेला तणाव पाहता भारतानेही जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कर तैनात केले आहे. हवाई दलालाही सुसज्ज राहण्यास सांगितले असून हिंदी महासागरात नौदलाने गस्त प्रारंभ केली आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दलाने आधुनिक लढाऊ विमाने खरेदीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. दरम्यान, रशियाकडून खरेदी होणाऱ्या ‘मिग- २९’ आणि सुखोई विमानांसोबतच फ्रान्सच्या सहा राफेल लढाऊ विमानांचा दुसरा ताफा देखील भारतीय हवाई दलाला या महिन्या अखेरपर्यंत मिळणार असल्याने हवाई दलाची मारक क्षमता वाढेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sukhoi and MiG aircraft from Russia Approval from Defense