
'बिग बुल' राकेश झुनझुनवालांच्या निधनावर PM मोदींनी वाहिली श्रद्धांजली
स्टॉक मार्केटमध्ये बिग बुल म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक राकेश झुनझुनवाला यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी राकेश झुनझुनवाला यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतातल्या अतिशय लोकप्रिय गुंतवणूकदारांमध्ये ते आघाडीवर होते. त्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.(pm narendra modi condoles rakesh jhunjhunwalas death)
झुनझुनवाला यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पीएम मोदींनी लिहिले की, 'राकेश झुनझुनवाला अदम्य होते. जीवनाने परिपूर्ण, विनोदी आणि अभ्यासपूर्ण, त्यांनी आर्थिक जगामध्ये अमिट योगदान दिले आहे. भारताच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्कट होते. त्यांचे जाणे दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांसाठी माझ्या संवेदना. ओम शांती.' अशा आशयाचे ट्विट करत मोदी यांनी झुनझुनवाला यांच्या निधनावर श्रद्धांजली वाहिली आहे.
राकेश झुनझुनवाला हे गुंतवणूक क्षेत्रातील दिग्गज आहेत. भारताचे वॉरेन बफे अशी त्यांची ओळख आहे. कारण, बाजारातील नफा आणि तोटा याची अचूक जाण त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळेच त्यांनी खरेदी केलेले स्टॉक मालामाल होतात असं म्हटलं जातं. झुनझुनवाला हे एक व्यापारी असून ते सीए आहेत. फोर्ब्सच्या यादीतील भारतीय श्रीमंतांच्या यादीत ते ४८ व्या क्रमांकावर आहेत. हंगामा मीडिया आणि अॅपटेकचे ते चेअरमन असून व्हॉईसरॉय हॉटेल्स, कॉनकॉर्ड बायोटेक, प्रोवोग इंडिया आणि जिओजित वित्तीय सेवा या कंपन्यांच्या संचालकीय मंडळातही त्यांचा समावेश आहे.