विकासाचा आराखडा तयार करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi development Plan

विकासाचा आराखडा तयार करा; पंतप्रधान नरेंद्र मोदी

मानगड : राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने आदिवासींच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या मानगड धामच्या विकासासाठी आराखडा तयार करायला हवा, अशी अपेक्षा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. १९१३ रोजी मानगड येथे ब्रिटिशांनी आदिवासींचे हत्याकांड घडवून आणले होते. मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी राजस्थानातील मानगड धाम येथे पोचले. तेथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानगड धामला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ते म्हणाले, की, १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामापूर्वी आदिवासी समुदायाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले होते.

मानगड धाम हे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचा वारसा सांगणारे ठिकाण आहे. या राज्यांनी एकत्र येऊन मानगड धामच्या विकासाचा आराखडा तयार करावा. चार राज्य आणि भारत सरकारच्या सामूहिक प्रयत्नातून या स्थानाचे महत्त्व आणखी अधोरेखित करायला हवे, असे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना येथे येणे प्रेरणादायी आहे. हे ठिकाण आदिवासींच्या तपश्‍चर्येचे, त्यागाचे आणि भक्तिचे प्रतिबिंब आहे.

गोविंद गुरूसारखे महान स्वातंत्र्यसैनिक हे भारतीय परंपरा आणि आदर्शाचे प्रतीक आहेत. ते एखाद्या राज्याचे राजे नव्हते, मात्र ते लाखो आदिवासींचे नायक होते. त्यांनी सर्वस्व गमावले. मात्र धैर्य कधीही गमावले नाही. १७ नोव्हेंबर १९१३ मध्ये मानगड येथे झालेले हत्याकांड हे इंग्रजी राजवटीच्या क्रुरतेचा कळस होता.

दुर्देवाने आदिवासी समाजाने दिलेल्या बलिदानाची इतिहासात स्थान दिले नाही. आज ती उणीव भरून काढायची आहे. आपला इतिहास, वर्तमान व भविष्य आदिवासी समाजाशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या इतिहासाच्या पानोपानी आदिवासी शौर्याचे धडे आहेत, असेही मोदी म्हणाले.

अशोक गेहलोत म्हणाले...

मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले, की आपण काही दिवसांपूर्वी मानगड धामसंदर्भात राज्यांशी चर्चा केली आणि त्यानुसार कामे केली जाणार आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान म्हणाले, की स्वातंत्र्य हे चांदीच्या ताटात मिळाले नाही. हजारो आदिवासींच्या बलिदानाचे विस्मरण झाले. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले, की १७ नोव्हेंबर १९१३ चा काळा दिवस कोणीही विसरू शकत नाही.

गेहलोत आमच्यात वरिष्ठ : मोदी

व्यासपीठावर राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, की मुख्यमंत्री या नात्याने आम्ही सोबत काम केले आहे. अशोक गेहलोत हे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्यापैकी सर्वांत वरिष्ठ आहेत.

मानगडचा इतिहास

मानगड धाम हे बान्सवाडा जिल्ह्यात आहे. हा पर्वतीय भाग गुजरात आणि राजस्थानात विस्तारलेला आहे. गोविंद गुरू यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलन पुकारण्यात आले होते. १९१३ मध्ये मानगड धाम येथे ब्रिटिश सरकारने १५०० आदिवासींचे हत्याकांड घडवून आणले. त्यांच्या स्मरणार्थ मानगड धामची स्थापना करण्यात आली आहे.