...तर 2040 मध्ये पूर्ण झाले असते अटल बोगद्याचे काम, PM मोदींचा यूपीएवर निशाणा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

2002 मध्ये अटलजी सरकारने या बोगद्याचा शिलान्यास केला होता. अटलजींचे सरकार गेल्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. 

रोहतांग- जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं आज (दि.3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणा साधला. वर्ष 2002 मध्ये अटलजी सरकारने या बोगद्याचा शिलान्यास केला होता. अटलजींचे सरकार गेल्यानंतर या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिस्थिती इतकी वाईट होती की, 2013-14 पर्यंत या बोगद्याचे फक्त 1300 मीटरपर्यंतचे काम झाले होते. तज्ज्ञांच्या मते 2014 मध्ये या बोगद्याचे ज्या गतीने काम होत होते. त्याच गतीने काम सुरु राहिले असते तर अटल बोगद्याचे काम पूर्ण होण्यास 2040 साल उजाडले असते, अशा शब्दांत त्यांनी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवर टीका केली. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील जुन्या आठवणी ताज्या केल्या. ते म्हणाले, आज फक्त अटलजींचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. तर हिमाचल प्रदेशातील कोट्यवधी लोकांचे अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अटल बोगद्याचे लोकापर्ण करण्याची मला संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो. 

मागच्या सरकारच्या उपेक्षेनंतही आमच्या सरकारने या कामाला वेग दिला. अटल बोगद्याच्या कामाने 2014 नंतर चांगलाच वेग घेतला. त्याचा परिणाम असा झाला की, जिथे प्रत्येकवर्षी 300 मीटर बोगदा बनत होता. तिथे त्याचा वेग वाढून तो 1400 मीटर प्रती वर्ष झाला. फक्त 6 वर्षांत आम्ही 26 वर्षांचे काम पूर्ण केले, असेही ते म्हणाले.

हे वाचा - 9.2 किमी लांब अटल बोगद्यासाठी 3 हजार 200 कोटींचा खर्च; काय आहेत वैशिष्ट्ये

दरम्यान, मनाली आणि लेहमधील अंतरही यामुळे जवळपास 50 किलोमीटरने कमी होणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या या बोगद्याची लांबी 9 किमी इतकी आहे. मनाली लेह हायवेवर रोहतांग, बारालचा, लुंगालाचा ला आणि तालंग ला यांसारखे पास आहेत पण बर्फवृष्टीच्या काळात इथून जाणं अशक्य होते. याआधी मनाली ते सिस्सू अंतर पार करण्यासाठी 5 ते 6 तास लागत होते ते आता फक्त एक तासात जाता येणार आहे. अटल बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने तयार केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra modi inaugurates Atal tunnel slams on UPA Government