पंतप्रधान मोदी यांचे `जावईशोध’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकात दोन दिवासांचे ध्यान करून दिल्लीस परतले.
पंतप्रधान मोदी यांचे `जावईशोध’
sakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकात दोन दिवासांचे ध्यान करून दिल्लीस परतले. 4 जून रोजी लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागणार असून, त्याकडे केवळ देशाचेच नव्हे, तर जगाचे लक्ष लागले आहे. भारतात लोकशाही टिकून राहाणार की गेले दहा वर्ष सुरू असलेल्या एका नेत्यांच्या नेतृत्वाखालील एकपक्षीय एकाधिकारशाही चालू राहाणार, हा प्रश्न विचारला जात आहे.

दरम्यान, मोदी यांनी अलीकडे पतिय़ाळा येथे `जावईशोध’ लावला आहे. `जावईशोध’ या वाक्प्रचाराचा अर्थ, ``मूळचे बरोबर असाताना त्यात ज्ञानाच्या घमेंडीने अडाणी माणसाने सुचविलेली दुरूस्ती’’ ते म्हणाले, `मला परमेश्वराने थेट पाठविले आहे.’’ त्यांना हा द्ष्टांत त्यांच्या मातोश्रीच्या मृत्यूनंतर झाला. ते म्हणाले,`मला बायालॉजिकल शरीरातून उर्जा मिळत नाही, पण परमेश्वरापासून उर्जा मिळते.’’ भारताच्या कोणत्या पंतप्रधानाने आजवर असे वक्तव्य केले आहे? पण, मोदी यांनी हे वक्तव्य करताच त्यांची री ओढत एक पाऊल पुढे टाकून भाजपचे अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा यांनी एका प्रचारसभेत सांगितले, ``मोदी देवता ओ के देवता है. (मोदी देवांचे देव आहेत).’’ खुषमस्करीची आणखी एक हद्द ओलांडली, ती भाजपचे प्रवक्ते व ओडिशातील जगन्नाथ पुरी येथील भाजपचे उमेदवार संविद पात्रा यांनी. ते म्हणाले, ``पुरीचा महाप्रभू जगन्नाथ हा मोदींचा भक्त आहे.’’ हे विधान करताच त्यांच्याविरूद्ध जोरदार टीका झाली. जनमत आपल्यावर उलटणार, असे दिसताच त्यांनी जाहीर माफी मागून प्रायश्चित्त म्हणून ``तीन दिवस उपास करणार,’’ असे जाहीर केले. राममंदिराची उभारणी झाल्यावर प्राणप्रतिष्ठा ज्या दिवशी व्हावयाची होती, त्यादिवशी बालक रामाला घेऊन मोदी मंदिराकडे जात आहेत, असे निरनिराळ्या टीव्ही चॅनेल्स वरून दाखविण्यात आले होते. राममंदिराचे पुजारी, धर्मगुरूंनी मोदी `भगवान विष्णुचा अवतार’ असल्याचे केव्हाच जाहीर केले आहे. नेत्याचे दैविकरण झाले, की त्याच्या भक्तांना आणखी जोर येतो. ते मानू लागतात की आपल्या कोणत्याही कृत्यामागे मग ते चांगले असो की वाईट, खुद्द परमेश्वर उभा आहे. म्हणून, कायदा हातात घेऊन काहीही करावयास तयार होता. मोदी यांना हे अभिप्रेत आहे की नाही, हे समजत नाही. परंतु, स्वतःला परमेश्वराचा अवतार असल्याचे सांगून मोदी यांनी जनतेची व मतदारांची दिशाभूल केली आहे व अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे, असेच म्हणावे लागेल. ते परमेश्वराचे अवतार असतील, तर देशाचे सारे प्रश्न चुटकीसरशी सुटावयास हवे होते. पण तसे गेल्या दहा वर्षात झालेले नाही.

दरम्यान, कन्याकुमारीतील टीव्हीच्या असंख्य कॅमेऱ्यांच्या झोतात मोदी यांनी केलेले ध्यान हे अर्थातच स्वप्रसिद्धी करता केले, असेच म्हणावे लागेल. आपण ``विवेकानंदांच्या आदर्शानुसार वाटचाल करीत आहोत,’’ असे 3 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखात त्यांनी वारंवार नमूद केले. ``माझ्या जीवनावर विवेकानंदांचा फार मोठा प्रभाव आहे,’’ असे ते म्हणतात. त्यांची भगवी वस्त्रे, कपाळावरील गंघ हे पाहिले, की ते कुणी साधु पुरूष असावे, असे पाहाणाऱ्याला वाटेल. शिवाय, असे ध्यान करणारा एकमेव पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल. या आधी कोणत्याही पंतप्रधानाने असे ध्यान केले नव्हते, तथापि, या आधी झालेल्या पंतप्रधानांनी देवालयांना भेटी दिल्या होत्या, धर्माचा बाजार केला नव्हता. 17 व्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीही 2019 मध्ये त्यांनी अखेरच्या दिवशी हिमालयात जाऊन ध्यान केले होते. हे सारे मतांसाठी होते, यात शंका नाही. त्याचे विश्लेषण करणेही आवश्यक ठरते.

हे विश्लेषण माजी राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या कार्यालयातील माजी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी व महात्मा गांधी व विवेकानंद यांचे गाढे अभ्यासक सत्यनारायण साहू यांनी `द वायर’ या संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखात केले आहे. ते म्हणतात, ``विवेकानंद यांना स्वप्रसिद्धी बिलकुल मान्य नव्हती. कॅलिफोर्नियातील शेक्सपियर कल्ब ऑफ पासाडेना येथे 27 जानेवारी 1900 रोजी केलेल्या भाषणात ते म्हणाले, ``एनी सेल्फिश अँड सेल्फसीकिंग एक्शन लॉंन्च्ड विथ न्यूजपेपर्स ब्लाझोनिंग अँड मॉब्स स्टँडिग अँड चिरींग वुड फेल टू रिच द मार्क.’’ मोदी यांनी नेमके तेच केले. अर्थात त्यांचे ध्यान साऱ्या देशाने पाहिले. त्यांचा हेतू साध्य झाला. 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीतील शेवटचे मतदान होण्याच्या एक दिवस आधी मोदी हिमालयातील एका गुहेत ध्यान करावयास गेले होते, हे साऱ्या देशाने पाहिले आहे. अशा प्रकारे आजवर कोणत्याही पंतप्रधानाने मते मिळविण्यासाठी हा मार्ग चोखाळला नाही. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी देवालयांना भेटी दिल्या, पूजा आदी केल्याचे आपण पाहिले आहे. 27 सप्टेंबर 1894 रोजी आपल्या तामिळ शिष्याला लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, ``धिस नॉनसेन्स ऑफ पब्लिक लाईफ अँड न्यूजपेपर ब्लेझोनिंग हॅज डिस्गस्टेड मी थरली. आय लाँग टू गो बॅक टू द हिमालयन क्वाएट.’’ विवेकानंदांनी भारताची व्याख्या करताना ``इंडिया इन टर्मस् ऑफ वेदांतिक ब्रेन अँड इस्लामिक बॉडी’’ असे वर्णन केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या या व्याख्येचे गेल्या दहा वर्षात आपल्या देशात कुठेतरी प्रतिबिंब पडले आहे काय?

मोदी यांचा आणखी एक जावई शोध म्हणजे, ``रिचर्ड एटेनबरो यांनी महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट काढण्यापूर्वी गांधी जगाला ठाऊकच नव्हते,’’ हा होय. ज्याला इतिहासाचे ज्ञान नाही, तोच असे वक्तव्य करू शकतो. ते भक्तांच्या गळी उतरलेही. परंतु, ज्याला दक्षिण आफ्रिकेतील स्वातंत्र्य लढ्यात गांधीजींनी केलेले योगदान, अहिंसात्मक लढा व त्यातून अमेरिकेतील कृष्णवर्णीय नेते मार्टीन ल्यूथर किंग ज्युनियर, दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे नेते व स्वातंत्र्य सेनानी नेल्सन मंडेला यांनी घेतलेली स्फूर्ती व देशात परतल्यावर गांधीजींनी ब्रिटिश सत्तेशी दिलेला लढा याची माहिती व जाणीव नाही, अशाच नेत्याकडून गांधी विषयी असे वक्तव्य होऊ शकते. गांधीजींच्या जीवनावर `महात्मा गांधी - 20 एथ सेन्च्युरी प्रॉफेट’ हा अमेरिकन माहितीपट 1953 मध्ये निघाला. 1982 मध्ये एटेनबरो यांचा चित्रपट येण्यापूर्वी इतिहासकार स्टॅन्ले वोलपर्ट यांच्या 1962 मधील `नाईन अवर्स टू राम’ या पुस्तकावर आधारीत 1963 मध्ये चित्रपट निघाला. त्यात जे.एस.कश्यप यांनी गांधीजींची भूमिका केली होती. त्यानंतर 1986 ते 2023 दरम्यान गांधीजीच्या जीवनावर वा त्यांच्या अहिंसेच्या तत्वाची माहिती देणारे तब्बल 27 चित्रपट निघाले. गांधीजी दोन दशकांहून दक्षिण आफ्रिकेत राहिले. तेव्हाच त्यांची कीर्ती देशविदेशात परसली होती. जगातील 70 पेक्षा अधिक देशात गांधीजींचे अर्ध वा पूर्णाकृती पुतळे आहेत. त्यांच्या अहिंसा या तत्वाचे गेल्या शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ जगात अध्ययन सुरू आहे. साबरमती आश्रम हा मोदी यांच्या अहमदाबादचा. परंतु, गांधीजींशी निगडीत असलेल्या अऩेक संस्थावर आता भाजपचे वस्चस्व असून त्यांनी स्वीकारलेल्या अहिंसा, सहिष्णुता, धार्मिक समरसता यांचे अनुकरण मोदी यांनी केलेले नाही. म्हणूनच मोदी यांचे ``1982 नंतरच गांधीजी जगाला ठाऊक झाले,’’ हे विधान सत्याला धरून नाही, असेच म्हणावे लागेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com