1987 मध्ये वापरला डिजिटल कॅमेरा आणि ई-मेल; मोदींच्या दाव्याने खळबळ

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मे 2019

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे रंगीत छायाचित्र काढण्यासाठी मी 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हे छायाचित्र ई-मेलच्या साह्याने पाठविले होते,'' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या नव्या दाव्याने त्यांना पुन्हा एकदा टीकेचे धनी व्हावे लागले आहे.
 

नवी दिल्ली ः भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे रंगीत छायाचित्र काढण्यासाठी मी 1987-88 मध्ये डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसेच हे छायाचित्र ई-मेलच्या साह्याने पाठविले होते,'' असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केला आहे. त्यांच्या नव्या दाव्याने त्यांना पुन्हा एकदा टीकेचे धनी व्हावे लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट हवाई हल्ल्यापूर्वी ढगाळ वातावरणामुळे विमाने रडारवर दिसणार नाहीत व त्याचा फायदा होईल, असे सांगितले होते. त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले. त्याच मुलाखतीत मोदींनी 1987 मध्ये डिजिटल कॅमेरा व ई-मेल वापरल्याचे वक्तव्य केले आहे. 

पंतप्रधानांच्या दाव्यावर अनेकांनी आक्षेप घेत 1995 पूर्वी ई-मेल सेवाच उपलब्ध नव्हती, असे स्पष्ट केले आहे. ई-मेल सेवा अधिकृतपणे सुरू होण्याआधीच मोदी यांनी भारतात त्याचा वापर कसा केला, असा प्रश्न सोशल मीडियावरून उपस्थित केला गेला आहे. 

दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी म्हटले आहे, "1987-88 दरम्यान मी पहिल्यांदा डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. त्या वेळी फार कमी लोक ई-मेलचा वापर करीत होते. त्या वेळी डिजिटल कॅमेऱ्याचा आकार मोठा होता. माझ्याकडे डिजिटल कॅमेरा होता. अडवानी यांच्या रॅलीवेळी मी त्यांचा फोटो काढला आणि दिल्लीला पाठवला. रंगीत फोटो प्रसिद्ध झाल्याचे पाहून लालकृष्ण अडवानी यांना आश्‍चर्य वाटले होते.'' 

सोशल मीडियावर ट्रोल 
या वक्तव्याबद्दल मोदींना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. माजी राज्यसभा खासदार शाहिद सिद्दीकी यांनी ट्‌विट करीत म्हटले आहे, ""नरेंद्र मोदी यांनी नाल्यातून गॅस तयार करण्याचे आणि रडारपासून वाचवणाऱ्या ढगांप्रमाणे डिजिटल कॅमेरा आणि ई-मेलची निर्मिती केली आहे.'' 

कॉंग्रेसनेत्या दिव्या स्पंदना यांनी ट्‌विट केले आहे, की 1988 मध्ये जगात कोणाकडेही ई-मेल नसताना यांच्याकडे ई-मेल आयडी होता. पण, अशा वेळी यांना ई-मेल पाठवत तरी कोण होते? हा खरा प्रश्‍न आहे. 

निकॉनने पहिला डिजिटल कॅमेरा 1986 मध्ये तयार केला होता. त्यानंतर लगेचच तो मोदींकडे कसा आला? असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi says he used email digital camera in 1988