
पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यापासून अवघ्या एक कॉलपासून दूर असल्याचे म्हटले होते.
नवी दिल्ली- शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेस तयार असून हे सर्वजण पंतप्रधांनाच्या निरोपाची वाट पाहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय बैठकीत सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यापासून अवघ्या एक कॉलपासून दूर असल्याचे म्हटले होते. पंतप्रधानांनतर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनीही शेतकरी नेत्यांना जेव्हा वाटेल तेव्हा त्यांनी फोन करावा त्यांच्याशी चर्चा करु असे म्हटले होते. यावर टिकैत यांनी पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा नंबर द्यावा, म्हणजे आम्हाला त्यांना फोन करता येईल, असे म्हटले आहे. टिकैत हे दिल्ली आणि उत्तर प्रदेशदरम्यान असलेल्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत.
दुसरीकडे, भाजप नेते आणि माजी केंद्रिय मंत्री केजे अल्फान्सो यांनी शुक्रवारी राज्यसभेत राकेश टिकैत यांच्यावर टीका केली. राकेश टिकैत हे 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिसांचारानंतर रडल्यामुळे वाचू शकत नाहीत. ते म्हणाले की, श्रीमान टिकैत, तुम्ही आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहात आणि लोकांना काठ्या घेऊन येण्यास सांगता. मग शेवटी तुम्ही डोळ्या पाणी आणून म्हणता की, मला माफ करा.. मला याबाबत काहीच माहिती नव्हते..जेव्हा सरकारविरोधात द्वेष पसरवता, लाल किल्ल्यात जे झाले तो देशद्रोह होता. मग जर तो देशद्रोह नव्हता तर मला तो प्रकार काय होता ते सांगा, असा सवाल अल्फान्सो यांनी केला.
हेही वाचा- नवी मुंबईत मनसे नेत्यांची उघड उघड गुंडगिरी, तीन पदाधिकाऱ्यांना वाशी पोलिसांकडून दट्ट्या
दरम्यान, कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. प्रजासत्ताक दिनी झालेल्या ट्रॅक्टर परेडनंतर शेतकरी आंदोलनाला अधिक धार देण्यासाठी संघटनांनी आज (दि.6) देशव्यापी 'चक्का जाम'ची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेससह अनेक पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शनिवारी चक्का जाम होणार नाही. शेतकरी देशातील इतर भागात शांततापूर्ण पद्धतीने तीन तास राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा- जॅकलिनने विकत घेतलं प्रियांका चोप्राचं जुनं घर; जाणून घ्या किंमत