देश उत्तराखंडच्या पाठिशी - मोदी

देश उत्तराखंडच्या पाठिशी - मोदी

हल्दिया (प. बंगाल) - उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमनदी कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मोठा धक्का बसला असून या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते आज पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. संपूर्ण देश उत्तराखंडच्या पाठिशी असल्याचेही मोदी म्हणाले. 

चमोलीमधील या नैसर्गिक आपत्तीमध्ये दोन प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले असून किमान १५० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. बचावकार्यावर आपले पूर्ण लक्ष असल्याचे मोदी यांनी सांगितले. येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की,‘‘आज आपण गंगामातेच्या दुसऱ्या टोकाला आहोत. मात्र, जिथे गंगेचा उगम होतो, तिथे मोठी आपत्ती आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि बचाव दलांशी मी सतत संपर्कात आहे.’’ या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मोदींनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. पुरामुळे ऋषीगंगा नदीवर असलेला १३.२ मेगावॉटचा जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे वहून गेला. उत्तराखंडमध्ये केदारनाथला जून २०१३ मध्ये ढगफुटी झाली होती. यावेळी आलेल्या विनाशकारी पुरात ५७०० जणांचा मृत्यू झाला होता.

जोशीमठाच्या जवळ झालेल्या घटनेमुळे चिंता निर्माण झाली आहे. सर्वांच्या सुरक्षितेसाठी मी प्रार्थना करतो. बचाव कार्य योग्य दिशेने सुरु असल्याचा मला विश्‍वास आहे. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

या पुराचा फटका बसलेल्या सर्व जणांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो. 
- व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती 

उत्तराखंडमधील घटनेमुळे धक्का बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या जिवीत हानीमुळे व्यथित झाले आहे. जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना मी करते. 
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. देवभूमीला शक्य ती मदत केली जाईल. केंद्र सरकार उत्तराखंडच्या पाठिशी आहे. 
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उत्तराखंडमध्ये आलेल्या आपत्तीचा सामना करण्यासाठी उत्तर प्रदेशचे सरकार सर्व प्रकारचे साह्य करेल. 
-योगी आदित्यनाथ,मुख्यमंत्री,उत्तर प्रदेश

सेलिब्रिटींकडून दु:ख व्यक्त
उत्तराखंडमधील दुर्घटनेनंतर बॉलिवूडमधील अक्षयकुमार, अजय देवगण, तापसी पन्नू, सनी देओल आणि इतर अनेक कलाकारांनी दु:ख व्यक्त केले.

उत्तराखंडमधील हिमनदी तुटल्याचे दृ्‍श्य हादरवून टाकणारे होते. प्रत्येकाच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो. 
- अक्षयकुमार, अभिनेता

घटनेबद्दल दु:ख वाटत आहे. मात्र, लोकांनी कृपया अफवा पसरवू नये. 
- रेणुका शहाणे, अभिनेत्री

या ‘मानवनिर्मित आपत्ती’मुळे व्यथित झाले आहे. निसर्गाशी खेळ केल्याचा हा परिणाम आहे. 
- तापसी पन्नू, अभिनेत्री

निसर्ग अधिक धोकादायक होत आहे का? बचाव पथके अधिकाधिक लोकांना वाचविण्यात यशस्वी ठरतील, अशी मला आशा आहे. 
- अजय देवगण, अभिनेता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com