सकाळी सकाळी सुरक्षा ताफ्याशिवाय PM मोदींची दिल्लीच्या गुरुद्वाऱ्याला भेट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 December 2020

हा दौरा अनियजित तर होता.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी दिल्लीमधील रकब गंज साहिब या गुरुद्वारामध्ये गुरु तेग बहादुर यांचे दर्शन घेण्यासाठी अचानकच पोहोचले होते. हा दौरा अनियजित तर होताच शिवाय कसल्याही सुरक्षा ताफ्याशिवाय ते याठिकाणी पोहोचले होते.  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. गेल्या 24 दिवसांपासून कसलाही खंड न पडता शांततेने हे आंदोलन केले जात आहे. ऐन थंडीत बायका-मुलांसह या आंदोलक शेतकऱ्यांचा निश्चय अजिबात ढळलेला नाहीये. या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदींनी गुरुद्वाऱ्याला ही भेट दिली जात असल्याचं बोललं जात आहे.

शेतकरी आणि सरकार यांच्यात दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह चर्चेच्या पाच बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप या चर्चेमधून कसलाही तोडगा निघाला नाहीये. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी तयार रहावं, आम्ही कायद्यात बदल करण्यास तयार असल्याची सरकारची भुमिका आहे तर हे कायदे रद्दच करा, अशी शेतकऱ्यांची भुमिका ठाम आहे. यादरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांतील आपल्या कार्यक्रमांमधून हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्याच फायद्याचे असल्याचे नमूद केले होते. तसेच या कायद्यांबाबत गैरसमज पसरवून विरोधकांची दिशाभूल केली जात असल्याचं मोदींनी म्हटलं  होतं.

हेही वाचा - Gold Price Update : खुशखबर! लग्नसराईत सोन्याच्या किंमतीत आणखी घट

 काल शनिवारी गुरु तेग बहादुर यांच्या शहिद दिवसानिमित्त मोदींनी ट्विट करुन त्यांना आदरांजलीही वाहिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, श्री गुरु तेज बहादुर जी यांचं आयुष्य म्हणजे धैर्य आणि करुणेचे प्रतीक आहे. त्यांच्या शहीदी दिवसानिमित्त, मी महान श्रीगुरु तेज बहादुरजी यांना नमन करतो आणि न्यायी आणि सर्वसमावेशक समाजासाठी त्यांची दृष्टी आठवते. गुरु तेगबहादुर हे शिखांच्या दहा गुरुंपैकी नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसरमध्ये 1621 रोजी झाला. त्यांची पुण्यतिथी ही शहिद दिवस म्हणून साजरी केली जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi visited Gurudwara Rakab Ganj Sahib today morning and paid tributes to Guru Teg Bahadur for his supreme sacrifice