लोकसभेत उद्या मोदी विरोधकांवर करणार हल्लाबोल; शेतकरी आंदोलन संपवण्याचे करतील आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कृषी कायद्यांचे समर्थन करतानाच आंदोलक शेतकऱ्यांनी कायद्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. त्यांनी देशाला FDI "फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट"ची संकल्पना सांगितली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर उत्तर देण्याची शक्यता आहे. 

राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलन ते कोरोना विरोधात भारत लढत असलेली लढाई अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी शेतकऱ्यांना विश्वास दिला की कृषी कायदे त्यांच्या हिताची आहेत. या कायद्यांमुळे देशातील 12 कोटी छोट्या शेतकऱ्यांना थेट फायदा होईल. तसेच मोदींनी आंदोलन शेतकऱ्यांसोबत शक्य ती चर्चा करण्याची तयारी दाखवली. सोबतच विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करण्यास ते विसरले नाहीत. 

कृषी कायद्यांवर आम्ही चर्चेला तयार आहोत. मी सभागृहातून आवाहन करतो की, शेतकऱ्यांनी चर्चेला यावं, असं आवाहन मोदींनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'ग्रामीण अर्थव्यवस्थेचं एक मोल आहे. अर्थव्यवस्थेचा हा महत्त्वाचा कणा आहे. गेल्या दोन दशकांपासून कृषी क्षेत्रातील सुधारणांवर चर्चा सुरू आहे. पण, ही केवळ चर्चा आहे. आम्ही पावले उचलली. डॉ. मनमोहन सिंग सभागृहात उपस्थित आहेत. शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देण्यावर त्यांनीही मत व्यक्त केलं होतं. आम्ही तेच काम करत आहोत. एखाद्या कुटुंबातही एकमेकांवर नाराजी असते. पण, सध्या कृषी कायद्यांवर चर्चा होत नाही. केवळ विरोध होत आहे.'

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच देशात सध्या आंदोलन करण्याची फॅशन आली असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या देशात एक नव्या प्रकारची जमात तयार होत आहे. हे आंदोलनजीवी जमात असून आंदोलन केल्याशिवाय जगूच शकत नाही. वकीलांचं , विद्यार्थ्यांचं कुणाचंही आंदोलन असो हे तिथंच असतात. हे आंदोलनजीवी लोकांना ओळखायला हवं. देश आंदोलनजीवी लोकांपासून वाचो. हे सगळे आंदोलनजीवी परजीवी असतात, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बोचरी टीका केली.

फॉरेन डिस्ट्रक्टीव्ह आयडॉलॉजी पासून वाचायला हवं. यासाठी आपल्याला जागृत रहायला हवं, असं म्हणत मोदी यांनी शेतकरी आंदोलनावरुन आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर भाष्य केलं. विरोधक कोणत्याही मुद्द्यांवर विरोध करत आहे. विरोध करण्यात काही गैर नाही, पण देशाला तोडणाऱ्या मुद्द्यांविरोधात तरी त्यांनी एकजूट राहायला हवं, असं ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi will talk in loksabha farmer protest corona