मोदींना प्रभावशाली ठरविणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे 'हे' आहे सत्य

वृत्तसंस्था
रविवार, 23 जून 2019

ब्रिटीश हेराल्ड या पोर्टलने घेतलेल्या सर्वेक्षणात ब्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल घेतला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावे ठेवण्यात आली. यामध्ये मोदींना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे त्यांना जगातील प्रभावशाली व्यक्ती ठरविण्यात आले. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

ब्रिटीश हेराल्ड या पोर्टलने घेतलेल्या सर्वेक्षणात ब्लादिमीर पुतीन, डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग यांना मागे टाकून मोदींनी येथे बाजी मारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. ब्रिटीश हेराल्डने जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती निवडण्यासाठी वाचकांचा पोल घेतला होता. या नामांकनाच्या यादीत जगातील 25 प्रभावशाली व्यक्तींचा समावेश केला होता. अखेरच्या टप्प्यात समीक्षकांसमोर चार उमेदवारांची नावे ठेवण्यात आली. यामध्ये मोदींना सर्वाधिक मते मिळाली. त्यामुळे त्यांना जगातील प्रभावशाली व्यक्ती ठरविण्यात आले. 

झी न्यूज, रिपब्लिक टीव्ही आणि आज तक या काही माध्यमसमुहांसह भाजप नेत्यांनी ब्रिटीश हेराल्ड हे जागतिक पातळीवरील प्रसिद्ध ऑनलाईन वेब पोर्टल असल्याचे म्हटले आहे. मात्र, हे वेबपोर्टल एका भारतीय नागरिकाचे असून नुकतेच एप्रिल 2018 मध्ये ते सुरू करण्यात आले आहे. या निवड प्रक्रियेचे मुल्यांकन मतांची आकडेवारी, व्यापक संशोधनच्या आधारावर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, नावात ब्रिटिश असलेले हे मॅगझिन ब्रिटिशांनी स्थापन केलेले नसून हेराल्ड मिडीया नेटवर्क नावाची भारतीय माणसाची ही कंपनी आहे. केरळमधील कोचीन हेराल्डचे संपादक अन्सिफ अशरफ हेच या ब्रिटीश हेराल्डचे मालक आहेत. अशरफ यांचे या कंपनीत 85 टक्के शेअर्स असून एप्रिल 2018 मध्ये हे मॅगझिन किंवा ऑनलाईन वेबपोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध मॅगझिन असल्याचे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल. तरीही, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह मोठ-मोठ्या भाजप नेत्यांनी या ब्रिटीश हेराल्डचे ट्विट रिट्विट करत हा भारताचा मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

भाजप नेते गिरीराजसिंह यांनी मोदींचा उल्लेख सुप्रिम लिडर असा केला आहे. ब्रिटीश हेराल्डच्या ट्विटर अकाउंटला फक्त 4 हजार फॉलोअर्स आहेत. तर, फेसबुक फेजला 57 हजार फॉलोअर्स आहेत. ब्रिटीश हेराल्डचे स्वतःचे विकिपीडिया पेजही नाही. ग्लोबल अॅलेक्सा वेब ट्राफीकमध्ये ब्रिटीश हेराल्डचा 28, 518 एवढा नंबर आहे. त्या तुलनेत आपल्याकडील इंडियाटाईम्स (190) आणि एनडीटीव्ही (395) यांची कामगिरी चांगली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi winning British Herald readers poll, but what is British Herald