Heeraben Modi Demise : पंतप्रधान मोदींच्या मातोश्री पंचत्वात विलीन; देशासह जगभरातून श्रद्धांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heeraben Modi PM narendra Modi
Heeraben Modi Demise Live Updates : आई हिराबेन यांच्या अंत्यदर्शनासाठी PM मोदी गुजरातेत दाखल

Heeraben Modi Demise : पंतप्रधान मोदींच्या मातोश्री पंचत्वात विलीन; देशासह जगभरातून श्रद्धांजली

जपानच्या पंतप्रधानांनी वाहिली हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

"आई गमावणं म्हणजे..."; आनंद महिंद्रांनी वाहिली श्रद्धांजली

आईचं वय कितीही असो, तिला गमावणं म्हणजे आपल्या आत्म्याचा एक भाग हरवण्यासारखं आहे. मी नरेंद्र मोदी यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो, असं ट्वीट उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

तुमची आई आमचीही आई; ममता बॅनर्जींनी व्यक्त केलं दुःख

पश्चिम बंगालमध्ये वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. आईच्या निधनामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिराबेन यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तुमची आई आमचीही आईच होती, अशा शब्दांत त्यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

हीराबेन मोदी यांच्या निधनावर कंगना,अक्षयच्या भावूक पोस्ट,'या' सेलेब्सनीही व्यक्त केला शोक

जगभरातून अनेक लोक पंतप्रधानांच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत. तर आता अनेक बॉलीवूड कलाकारांनीही ट्वीट करत हीराबेन मोदी यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. कंगना रनौत,कपिल शर्मा,अनुपम खेर,अक्षय कुमार अशा अनेक कलाकारांनी पंतप्रधान मोदी यांच्या आईसाठी भावूक पोस्ट शेअर केल्या आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोदींच्या मातोश्री अनंतात विलीन; जड अंतकरणाने मोदी परतले!

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. त्यानंतर पंतप्रधान मोदी परतले. आता ते आपले नियोजित कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार आहेत.

दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मिळो; राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी ह्यांना मातृवियोग झाला. आईचं मायेचं छत्र गमावणं ह्या इतकं मोठं दुःख असूच शकत नाही. ह्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ मोदीजींना ईश्वराने देवो हीच प्रार्थना. मोदीजींच्या आईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची विनम्र श्रद्धांजली.

पार्थिव स्मशानभूमीत दाखल; अंत्यविधींना सुरुवात

हिराबेन मोदी यांचं पार्थिव स्मशानभूमीत दाखल झालं असून त्यांच्यावर अंत्यसंस्कारांनाही सुरुवात झाली आहे.

आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही; संजय राऊतांनी व्यक्त केला शोक

आईचे छत्र हरपणे या सारखे अनाथपण नाही.आई जाण्याचे दुःख मोठे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आई हिराबेन यांच्या दुःखद निधनाने त्यांच्या कुटुंबीयावर आघात झाला आहे.ईश्वर मातोश्री हीराबेन यांच्या आत्म्यास शांती देवो. मोदी कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

कठीण समयी मोदींना बळ मिळो; राहुल गांधींची प्रार्थना

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये राहुल गांधी म्हणतात, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री श्रीमती हिरा बा यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण समयी मी त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराबद्दल संवेदना आणि त्यांना प्रेम व्यक्त करतो."

आईचा संघर्ष सांगणारा PM मोदींचा भावनिक लेख

हिराबेन यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींनी लिहिलेला हा ब्लॉग. यामध्ये नरेंद्र मोदी यांनी हिराबेन यांच्या आयुष्यातल्या संघर्षाबद्दल सविस्तर लिहिलं होतं. आपल्या वेबसाईटवर त्यांनी हा ब्लॉग शेअर केला होता.

हा ब्लॉग वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही व्यक्त केल्या सहवेदना

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या आई हिराबेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये शिंदे म्हणतात, "पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दुःख झाले. आम्ही सर्व नरेंद्र मोदीजी यांच्या दुःखात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली."

PM मोदी अंत्ययात्रेत सहभागी

हिराबेन मोदी यांच्या अंत्ययात्रेत PM मोदी सहभागी झाले असून त्यांचं पार्थिव आता अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं आहे.

आईच्या अंत्यदर्शनासाठी PM मोदी भावाच्या घरी दाखल

हिराबेन यांचं पार्थिव पंतप्रधान मोदींचे भाऊ पंकज यांच्या घरी आणण्यात आलं आहे. मोदी अंत्यदर्शनासाठी इथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात अंत्ययात्रेला सुरुवात होईल. मोदी अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत.

PM नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं वयाच्या १०० व्या वर्षी निधन झालं. दोन दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना अहमदाबाद इथल्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या अंत्यदर्शनासाठी गुजरातेत दाखल होत आहेत.