J&K:तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 26 October 2020

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या तिरंग्यासंबंधीच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या तिरंग्यासंबंधीच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात भाजप आज श्रीनगर ते कुपवाडापर्यंत तिरंगा यात्रा काढत आहे. याच दरम्यान, लाल चौकातील क्लॉक टॉवरवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 

'लस राष्ट्रवादा'वरुन WHO चा गंभीर इशारा; सर्व देशांना केले आवाहन

पोलिसांनी चार भाजप कार्यकर्त्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. कार्यकर्ते लाल चौकात तिरंगा फडकावण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, नजरकैदेतून सुटका झाल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं होतं की, जोपर्यंत जम्मू-काश्मीर पुन्हा कलम 370 लागू केले जात नाही, तोपर्यंत त्या कोणताही झेंडा हाती घेणार नाहीत. यावेळी त्यांच्या टेबलवर काश्मीरचा झेंडा ठेवण्यात आला होता. 

मेहबुबा यांच्या वक्तव्यानंतर देशभरात अनेक संघटनानी विरोध दर्शवला आहे. भाजपने उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे मुफ्ती यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये पाठवा, असं शिवसेनेनं म्हटलं होतं. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 काढून टाकल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी काश्मीरच्या झेड्याकडे पाहात म्हटलं होतं की, विशेष दर्जा पुन्हा लागू होईपर्यंत कोणताही झेंडा हाती घेणार नाही.

मेहबुबा मुफ्ती आणि नॅशनल कॉन्फ्रेंसच्या नेत्यांनी कलम 370 पुन्हा लागू करण्यासाठी पीपल्स अलायंस फॉर गुपकार डिक्लेरेशनची स्थापना केली आहे. यामध्ये फारुख अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांचाही समावेश आहे. गुपकार डिक्लेरेशनच्या मागील बैठकीत फारुख अब्दुल्ला म्हणाले होते की, मी देशद्रोही नाही. मी केवळ माझ्या जम्मू-काश्मीरच्या लोकांसाठी न्याय मिळवू पाहात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police detain BJP workers who were trying to hoist national flag Lal Chowk