'लस राष्ट्रवादा'वरुन WHO चा गंभीर इशारा; सर्व देशांना केले आवाहन

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 26 October 2020

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडहोम यांनी कोरोना लशीच्या (Coronavirus vaccine) निर्मितीसाठी सर्व देशांनी एकता दाखवावी असं म्हटलं आहे

बर्लिन- जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस एडहोम यांनी कोरोना लशीच्या (Coronavirus vaccine) निर्मितीसाठी सर्व देशांनी एकता दाखवावी असं म्हटलं आहे. जगभरात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. कोरोना महामारीवर मात करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे सर्व देशांनी एकत्र यायला हवं, असं टेड्रोस म्हणाले आहेत. बर्लिन येथे आयोजित तीन दिवसीय जागतिक आरोग्य शिखर संम्मेलनाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते. 

सक्षम देशांनी गरीब देशांनाही लस मिळावी यासाठी विचार करायला हवा. आपल्या देशातील नागरिकांना पहिल्यांदा लस मिळावी असं वाटणं साहजिक आहे, पण जर आपल्याकडे प्रभावी लस असेल तर त्याचा वापरही प्रभावीपणे करायला हवा. असे करण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणजे एकाच देशातील सर्व नागरिकांना लस देण्यापेक्षा सर्व देशातील काही लोकांना लस देणे हा आहे. 'लस राष्ट्रवाद' कोरोना महामारीचा काळ कमी करण्यापेक्षा जास्त वाढवेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

कोरोनाचा वेग आणखी मंदावला, अनेक महिन्यानंतर मृतांची संख्याही 500 पेक्षा कमी

मोठ्या देशांची आघाडी

जगभरातील अनेक देश कोरोना विषाणूवर प्रभारी ठरणारी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. 50 पेक्षा अधिक लस चाचणीच्या टप्प्यात आहेत. यातील तिसरा टप्पा अत्यंत महत्वाचा असतो. यात हजारो स्वयंसेवकांचा समावेश केला जातो. यूरोपीय संघ, अमेरिका, ब्रिटेन, जपान आणि अन्य मोठ्या देशांनी कोरोना लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना याआधीच ऑर्डर देऊन ठेवली आहे. त्यामुळे गरीब देश या स्पर्धेत मागे पडतील, अशी चिंता निर्माण झाली आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेने या समस्येतून मार्ग काढण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय योजना सुरु केली आहे. पण, यासाठी लागणारा पैसा जमा करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. डब्लुएचओने रविवारी सर्व देशांना कोरोना महामारीला रोखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. युरोपमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. 

बिहारच नव्हे तर संपूर्ण देशाला मोफत कोरोना लस, केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

निष्काळजीपणा वाढतोय

उत्तर गोलार्धातील अनेक देशांसाठी सध्या संकटाचा काळ आहे. पण, कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी लोक शारीरिकरित्या कमकुवत नाहीत. विषाणूला दूर ठेवण्यासाठी कोरोना विषाणू नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. हात धुणे, शारीरिक अंतर ठेवण्यात लोक निष्काळजीपणा करत आहेत. बाहेर विनाकारण फिरत आहेत, असं संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुट्रेस म्हणाले आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus warns against vaccine nationalism